Previous अवसरद रेकण्णा आनंदय्या Next

आदय्य

पूर्ण नाव: आदय्य
वचनांकित : सौराष्ट्र सोमेश्वर
कायक (व्यवसाय): व्यापार


लाकडातील अग्नीप्रमाणे, दुधातील तुपाप्रमाणे,
देहातील चैतन्याप्रमाणे,
पिंडातील घनलिंग परिपूर्ण स्वायत झाल्याने
इहपर नष्ट झाले.
इहपर नष्ट झाल्याने नि:शून्य झाले,
सौराष्ट्र सोमेश्वरा, तुमचे शरण. / 1487[1]

तळहातावर लिंग असताना तो हातच कैलास, ते लिंगच शिव,
म्हणून इथेच कैलास आहे.
यापेक्षा वेगळ्या रजताद्रीला कैलास म्हणून
तेथील रुद्राला शिव म्हणत कैलासाला गेलो-आलो
असा भ्रम ठेवू नका अण्णा.
देहाचा अनुग्रह, लिंगावर श्रद्धा ठेवली नाही तर,
आणखी कोठे श्रद्धा ठेवणार आहे ?
इकडे तिकडे भटकून नष्ट होऊ नका, ऐका अण्णा.
अंगातच लिंगांग सामरस्य करुनी आत बाहेर एक होऊन रहा.
अग्निस्पर्शाने कापूर जळल्यासम, लिंगस्पर्शाने
सर्वांगातील अंगभाव जाऊन लिंगभावात तन्मय व्हावे,
त्यातील परमसुख उपमातीत आहे, सौराष्ट्र सोमेश्वरा. / 1482[1]

मा हा मूलतः सौराष्ट्र (गुजराथ) चा असून व्यापारासाठी पुलिगेरे (लक्ष्मेश्वर)ला आला. याचा काळ इ. स. ११६५. एक जैन कन्या पद्मावतीवर प्रेम करून तिच्याशी लग्न करतो. काही कारणाने सासऱ्याशी वाद घालून सौराष्ट्रहून सोमेश्वराची मूर्ती आणून त्याने पुलिगेरेमधील जैन बसदीमध्ये स्थापिली असा प्रसंग आदय्याचे रगळे (कथा), सोमनाथ चरित्र वगैरे ग्रंथांमध्ये रेखाटला आहे.

दगडात सुवर्ण जन्मले, म्हणून सुवर्ण दगडाचा
दास होईल का ?
शिंपल्यात मोती जन्मला, म्हणून मोती शिंपल्याचा
दास होईल का ?
धरतीवर वृक्ष-वेली उगवतात, म्हणून
वृक्ष-वेली धरतीच्या अधीन होतील ?
मातेच्या उदरातून शरण जन्मला, म्हणून
मातापित्यांचा दास होईल का ?
सौराष्ट्र सोमेश्वरा, तुमचे शरण
स्वतंत्र आहेत, अग्रगण्य आहेत. | / 1483 [1]

घट निर्मिणारा कुंभार घटात असत नाही,
शेत पिकविणारा शेतकरी पिकात असत नाही,
रथ निर्मिणारा शिल्पी रथात असत नाही,
सर्वांना खेळविणारा शिव,
कळसूत्री बाहुल्यांचा सूत्रधार असल्याप्रमाणे आहे.
म्हणून, सर्व शिवमय म्हणणा-या अज्ञानींना
प्रसन्न होणार नाही, आमचा सौराष्ट्र सोमेश्वर. / 1491 [1]

'सौराष्ट्र सोमेश्वर' या अंकिताने त्याने ४०३ वचने व स्वरवचने लिहिलेली सापडली आहेत. शरणधर्मतत्त्वाची व्यापक अशी चर्चा त्यांमध्ये दिसून येते. साहित्याचे सत्त्व व तात्त्विक श्रेष्ठता या दोन्हींचा त्याच्या वचनांमध्ये मिलाप दिसतो.

चौसष्ट विद्या शिकून काय करायचे आहे ?
असष्ठ तीर्थक्षेत्री जाऊन काय होणार आहे ?
ज्ञान आचरणात आणेपर्यंत
लिंग सोडले नि बांधले तरी काय होणार?
घनलिंगप्रकाश अंगी बाणलेल्या शरणांशिवाय कोणालाच
सौराष्ट्र सोमेश्वरलिंगाचे सुख मिळणार नाही. | / 1492 [1]

वेदांच्या मागे लागू नको, लागू नको.
शास्त्रांच्या मागे जाऊ नको, जाऊ नको.
पुराणांच्या मागे धावू नको, धावू नको.
आगमांच्या मागे भटकू नको, भटकू नको.
सौराष्ट्र सोमेश्वराचा हात धरल्यावर,
शब्दजालात सापडून व्याकूळ होऊ नको, होऊ नको. / 1511 [1]

References

[1] Vachanas selected from the book "VACHANA" (Edited in Kannada Dr. M. M. Kalaburgi), Marathi Version Translation by: Shri Shankar M. Patil, Smt. Savita S. Naadkatti. ISBN: 978-93-81457-10-8, 2012, Pub: Basava Samithi, Basava Bhavana Benguluru 560001.

सूचीत परत (index)
*
Previous अवसरद रेकण्णा आनंदय्या Next