पूर्ण नाव: |
अल्लमप्रभुदेव |
वचनांकित : |
'गुहेश्वर' |
कायक (काम): |
अनुभव मंडप अध्यक्ष (पूर्वी कायक मंदिरात मृदंग वाजविणे) |
कल्याणरूपी पणतीत भक्तिरसरूपी तेल ओतुनी,
सदाचाराच्या वातीस स्पर्शिता बसवण्णारूपी ज्योती,
झगमगतो हो शिवप्रकाश !
ह्या प्रकाशात विराजिती असंख्यात भक्तगण.
शिवभक्त असलेले क्षेत्रच पुण्यक्षेत्र हे असत्य आहे का ?
शिवभक्त असलेला देश पावन हे असत्य असे का ?
मम परमाराध्य संगनबसवण्णास
गुहेश्वरलिंगात पाहून कृतार्थ होई जीवन,
पहा हो सिद्धरामा. /496 [1]
अंगास माती न चिकटणा-या
कीटकापरी तू असशी ना बसवण्णा.
जलाशयातील कमळापरी ।
जलापासून निर्लिप्त तू असशी ना बसवण्णा.
जलोद्भव असूनही जळी न विरघळणा-या
मौक्तिकापरी तू असशी ना बसवण्णा.
तनुगुणांनी उन्मत्त नि ऐश्वर्याने अंध
झालेल्यांच्या संप्रदायाची,
गुहेश्वरलिंगाच्या आज्ञेने कशी केलीस दैना,
हे संगनबसवण्णा ?/509 [1]
शरणांच्या चळवळीमध्ये अल्लमप्रभूना खूप महत्त्वाचे स्थान आहे. अध्यात्म, अनुभाव क्षेत्रातील उच्च स्थान असलेल्या अल्लमप्रभूच्या जीवन साधनेबद्दल अनेक काव्ये लिहिली गेली आहेत. त्यांत हरिहर परंपरा व चामरस परंपरा असे दोन भाग दिसतात. अल्लमप्रभू शिवमोग्गा जिल्हा, शिकारीपुर तालुक्यातील बळ्ळीगावी येथे जन्मले. वडील निरहंकार व आई सुज्ञानी. बनवासीच्या मधुकेश्वर मंदिरात मृदंग वाजविणे हा त्यांचा कायक होता. त्यांच्या कलेवर मोहित होऊन कामलता नावाची युवती त्यांच्याशी लग्न करते. हरिहराच्या मते पत्नीच्या अकाली मरणामुळे अल्लमप्रभूचे विरक्त जीवन सुरू होते. परंतु चामरसाच्या मते मोहित होऊन आलेल्या मायादेवी नावाच्या राजकन्येचा अव्हेर करून अल्लमप्रभू मायाकोलाहल ठरतात.
अज्ञानरूपी पाळण्यात,
ज्ञानरूपी शिशुस निजवुन,
सकल वेदशास्त्ररूपी दोर बांधून,
जोजविते अंगाई गात,
भ्रांतीरूपी माय !
पाळणा मोडून, दोर तुटून,
अंगाई गीत थांबल्याविन,
गुहेश्वरलिंगाचे ना होई दर्शन./447 [1]
अमृतसागरी असता गायीची चिंता कशाला ?
मेरुमध्यात असता सुवर्णकणयुक्त माती
धुण्याची चिंता हवी कशाला ?
गुरुसान्निध्यात असता तत्त्वविद्येची चिंता कशाला ?
प्रसादाचरणात निष्ठ असता मुक्तीची चिंता कशाला ?
करस्थली लिंग विराजित असताना,
अन्य कशाची चिंता कशाला सांगा, गुहेश्वरा ?/451 [1]
अनिमिषदेव अल्लमप्रभूचे गुरू. त्यांच्या दर्शनाने ते त्यांचे शिष्य होऊन ज्ञानी होतात. नंतर चरजंगम होऊन देशसंचार करतात. गोग्गय्या, मुक्तायक्का, सिद्धराम, गोरक्ष वगैरे साधकांच्या मनामधील शिल्लक राहिलेला मळ काढून त्यांना साधनापथावर चालवितात. कल्याणमधील बसवेश्वरांचे महाआंदोलन पाहण्यासाठी सिद्धरामासह तेथे जातात व अनुभव मंटपाचे अध्यक्ष म्हणून काही वर्षे काम पाहतात. सर्व शरणांना आध्यात्मिक मार्गदर्शन करतात. कल्याण क्रांतीची चाहूल लागताच तेथून निघून श्रीशैलला जाऊन तेथे ऐक्य पावतात.
मन परिशुद्ध होईतो, तनू नग्न असुनी काय ?
भाव निर्भाव होईतो, शिरमुंडन करुनी काय ?
इंद्रियवृत्ती निग्रहपूर्वक भस्मसात करतो,
भस्मधारणा करुनी काय ?
वैराग्याच्या अशा सोंगाढोंगाला
गुहेश्वरा, तव साक्षीने ‘छि:' म्हणे मी./530 [1]
जनक-जननी नसलेला तू चिरंजीव,
तुझा तूच जन्माला येऊन वाढलास ना रे !
तुझी संतृप्तीच तुला प्राणतृप्ती होत आहे ना रे !
भेदू पाहणा-यांना अभेद्य होऊन,
तुझा तूच स्वयंप्रकाशित आहेस ना रे !
तुझे चरित्र तुजसाठी सहज
तुझे चरित्र तुजसाठी सहज रे, गुहेश्वरा./536 [1]
'गुहेश्वर' अंकिताने लिहिलेली १६४५ वचने, स्वरवचने, सृष्टिवचन, मंत्रगोप्य इ. साहित्य उपलब्ध आहे. त्यांच्या वचनांचा गाभा म्हणजे अध्यात्म, अनुभाव. त्यांतील खूप वचने गूढ भाषेत लिहिलेली असून अल्लमप्रभूचे ते वैशिष्ट्य आहे.
असो कोणत्याही जातीचा;
पुरातन शिवशरणांच्या
आदर्श पथावर चालून,
गुरुलिंगजंगमास अर्थप्राणाभिमान अर्पून,
अहंकार नाश केलेल्या महात्म्यांच्या
मुखातील ताम्बूल सेवन करीन,
त्यांची पारोशी वस्त्रे नेसीन.
त्यांची पादत्राणे माथ्यावर ठेवून
मी कंठेन जीवन,
जन्मजन्मांतरी त्या महागणांचा
मी दासानुदास होईन पहा, गुहेश्वरा./464 [1]
उभयदृष्टी एकदृष्टी होऊन पाहिल्यापरी
दंपती एकोभावाने राहिल्यास,
गुहेश्वरलिंगासी अर्पित होतसे,
संगनबसवण्ण
/472 [1]
देहामध्येच देवालय असता,
अन्य देवालयाची काय आवश्यकता ?
दोहोंचे प्रतिपादन करू नये.
गुहेश्वरा, तू स्वयं पाषाण असल्यास मी काय आहे ?
/541 [1]
दूरदूरपर्यंत क्षेत्रभ्रमंती करूनही नच लाभे.
गंगातीर्थी लक्ष स्नान करूनही नच लाभे.
मेरुगिरीच्या शिखरावरून सादवूनही नच लाभे.
नित्य व्रत-नेमांनी तनू शिणवूनही नच लाभे.
नित्य विषयस्मरणात रमणारे,
विषयांमागे क्षणोक्षणी धावणारे,
चंचल मन चित्तात स्थिर केल्यास,
गुहेश्वरलिंग केवळ परमज्ञा /625 [1]
References
[1] Vachanas selected from the book "VACHANA" (Edited in Kannada Dr. M. M. Kalaburgi), Marathi Version Translation by: Shri Shankar M. Patil, Smt. Savita S. Naadkatti. ISBN: 978-93-81457-10-8, 2012, Pub: Basava Samithi, Basava Bhavana Benguluru 560001.
*