Previous अमरगुंडचा मल्लिकार्जुनतंदे अमुगे रायम्मा Next

अमुगिदेवय्या

पूर्ण नाव: अमुगिदेवय्या
वचनांकित : सिद्धसोमनाथा
कायक (काम): कपडे विणणे

केवळ शिवस्मरणाने भवबंधन तुटते म्हणणाच्या
अविवेकीचे शब्द ऐकवत नाहीत, तसे सांगू नका हो.
ज्योतीच्या स्मरणाने अंधार दूर होईल का ?
मिष्टान्न स्मरणाने पोट कधी भरेल का ?
रंभेच्या स्मरणाने कामपूर्ती होईल का देवा ?
स्मरण पुरेसे नाही.
स्वत:ला ओळखून, स्वत: स्वयंभू होईपर्यंत,
सद्गुरू सोमनाथलिंगाचे केवळ स्मरण उपयोगाचे नाही. /1430 [1]

याचे गाव सोलापूर असून उद्योग विणकामाचा होता. याची पत्नी वरदानी असून याचा काळ इ. स. ११६०. महाराष्ट्रातील पुळजे येथे याचा उल्लेख असलेले शिलालेख सापडले आहेत. एकात, यादव चक्रवर्ती सिंघणदेवाने अमुगिदेवय्याची पूजा केल्याचा उल्लेख आहे. दुसऱ्या शिलालेखात 'माहेश्वरगण, कालान्वय दिवाकर, शरणसंतान, सिद्धकुलार्णव प्रवर्धनसुधाकर' इत्यादी शब्दांत त्याचे वर्णन आहे. सोलापूरच्या कपिलसिद्ध मल्लिकार्जुनाला आपल्या घरगुती सामानाचे गाठोडे वाहून न्यावयास लावणे, सिद्धरामाला अद्दल घडविल्याचा प्रसंग वगैरे काव्य-पुराणांमध्ये प्रामुख्याने आले आहेत. 'सिद्धसोमनाथ' अंकिताने याने लिहिलेली तीस वचने उपलब्ध आहेत. त्यामध्ये त्याची इष्टलिंगनिष्ठा व शरणतत्त्वाचे प्रतिपादन दिसून येते.

धुळीचा स्पर्श न होणा-या वा-यासम,
काजळाचा स्पर्श न होणा-या बुबुळासम,
तेलाचा स्पर्श न होणा-या जिभेसम,
मातीचा स्पर्श न होणा-या गांडुळासम,
सिद्धसोमनाथा, तुमचा शरण सकळ सुख उपभोगूनही
निर्लिप्त असतो. /1431 [1]

References

[1] Vachanas selected from the book "VACHANA" (Edited in Kannada Dr. M. M. Kalaburgi), Marathi Version Translation by: Shri Shankar M. Patil, Smt. Savita S. Naadkatti. ISBN: 978-93-81457-10-8, 2012, Pub: Basava Samithi, Basava Bhavana Benguluru 560001.

सूचीत परत (index)
*
Previous अमरगुंडचा मल्लिकार्जुनतंदे अमुगे रायम्मा Next