Previous उरिलिंगदेव उरिलिंगपेद्दींची पुण्यस्त्री काळव्वे Next

उरिलिंगपेद्दी

पूर्ण नाव: उरिलिंगपेद्दी
वचनांकित : उरिलिंगपेद्दीप्रिय विश्वेश्वरा
कायक (काम): विद्वान (पंडित)


अमृत सर्वांसाठी अमृतच असते, पण
कांहींना अमृत आणि काहींना विष असत नाही पहा.
त्याप्रमाणे श्रीगुरूंनी सर्वांनाच गुरू झाले पाहिजे,
उरिलिंगपेद्दीप्रिय विश्वेश्वरा. / 1543[1]

ब्रह्मा, विष्णू इत्यादी देवांना, दानवांना, मानवांना
आशेने ग्रासले, त्रासले पहा.
महत्तम, व्रतनियमी, श्रेष्ठता असणान्यांनाही बिघडवून
क्षुल्लक करून हास्यास्पद केले पहा..
सामर्थ्यशाली पुरुषांना ग्रासून, पराजित करून,
जिंकण्याचे सामर्थ्य आशेला आहे !
असा विचार करून पाहिले असता,
शिवशरण आशेवर आसक्त झाला, तर शिवाज्ञेने त्रस्त होईल.
शिवाला प्रसन्न करून घेतलेल्यांना आशा स्पर्श करीत नाही,
उरिलिंगपेद्दीप्रिय विश्वेश्वरा. / 1573[1]

पूर्वी चोरी करणारा हा, नंतर उरिलिंगदेवाचा शिष्य होऊन, श्रेष्ठ विद्वान व अनुभावी होऊन उच्च दर्जाची वचने लिहितो. काळव्वे याची पत्नी असून तिनेही वचने लिहिली आहेत. यांचा काळ इ.स. ११६० असून उरिलिंगदेवानंतर त्यांचा उत्तराधिकारी म्हणून उरिलिंगपेद्दी मठाधीश होतो. एक दलित व्यक्ती आपल्या योग्यतेने मठाधीश होण्याचे हे एकच विरळ उदाहरण सापडते. त्याचा पीठाधिकार ग्रहण म्हणजे एक क्रांतिकारक घटना होय. दलित लिंगायतांचे अनेक मठ कर्नाटकात असून ते सर्व उरिलिंगपेद्दी मठ म्हणून ओळखले जातात.

दिवा हाती घेऊन सुद्धा खड्यात पडणारे पाहिले.
अशा विधीच्या हाती नाही सहन करू शकत मी.
त्यासारखा होईन, ही चिंता नाही सहन करू शकत मी.
वेदरूपी महाज्योत धरून शिवपथावर चालणे न जाणता,
पापाच्या खड्यात पडणा-यांना पाहून हसू येते देवा.
गुरुपदेशरूपी ज्योत धरून, शिवपथावर चालून,
प्रसादरूपी निधी मिळवून, अनुभवून, तृप्त होऊन जगतो,
उरिलिंगपेद्दीप्रिय विश्वेश्वरा. / 1589[1]

लिंगाला जाणून घेतलेला लिंगवंत सर्वांग लिंगमूर्ती.
त्याचे बोलणे हेच वेद, त्याचे वागणे हेच शास्त्र,
पुराण, आगम, चरित्र आहे.
त्या महामहिमाच्या शब्दावर तर्क करू नये.
त्याच्या वागण्यावर अविश्वास दाखविला तर,
नरक चुकणार नाही देवा.
लिंग जाणलेल्या महामहिमावंताला
नमो नमो म्हणतो, उरिलिंगपेद्दीप्रिय विश्वेश्वरा. / 1581[1]

'उरिलिंगपेद्दीप्रिय विश्वेश्वरा' या अंकिताने त्याने लिहिलेली ३६६ वचने उपलब्ध आहेत. त्यांमध्ये गुरुमहिमेला अधिक महत्त्व देण्यात आले आहे. शिवाय लिंग-जंगमतत्त्वाचा विचार व कुलजातींची समस्याही विवेचिली आहे. वचनांमध्ये त्याने भरपूर संस्कृत श्लोक वापरल्यामुळे त्याचे संस्कृत पांडित्य उठून दिसते.

सूर्य नसताना दिवस असेल का देवा ?
दिवा नसताना प्रकाश असेल का देवा ?
पुष्प नसताना सुगंध मिळेल का ?
साकाराविना निष्कलाचे दर्शन होऊ शकत नाही.
लिंग हेच महाघन निराकार परशिवाचे दर्शन घडविते,
उरिलिंगपेद्दीप्रिय विश्वेश्वरा. / 1588[1]

स्तनामृत सेविणारे लेकरू साखरेची इच्छा करेल का ?
परीसप्राप्ती झालेला पुरुष सुवर्णमिश्रित माती धुऊन
सुवर्ण मिळविण्याची इच्छा करेल का ?
दासोह करणारा भक्त मुक्तीची इच्छा करेल का ?
या तिघांना दुसरी कसलीही इच्छा नाही.
रुचकर पदार्थासम, लिंगपद सहजसुख आहे देवा,
उरिलिंगपेद्दीप्रिय विश्वेश्वरा. / 1590[1]

References

[1] Vachanas selected from the book "VACHANA" (Edited in Kannada Dr. M. M. Kalaburgi), Marathi Version Translation by: Shri Shankar M. Patil, Smt. Savita S. Naadkatti. ISBN: 978-93-81457-10-8, 2012, Pub: Basava Samithi, Basava Bhavana Benguluru 560001.

सूचीत परत (index)
*
Previous उरिलिंगदेव उरिलिंगपेद्दींची पुण्यस्त्री काळव्वे Next