Previous अमुगिदेवय्या अरिविन मारितंदे Next

अमुगे रायम्मा

पूर्ण नाव: अमुगे रायम्मा
वचनांकित : अमुगेश्वरा

उत्तम घोड्यास चाबूक उगारतो का कोणी ?
नगराधिपती बनल्यानंतर जातिगोत्र शोधावे का ?
परमसुज्ञानीस प्राणाची आस असते का ?
लिंगासी अंगीकारलेल्या शरणाची,
पाहतील त्यांनी कुचेष्टा केल्यास संदेह कशासाठी बरे ?
इहलोकीच्यांनी निंदा केली म्हणून,
मनी विपरीत भाव कशासाठी बरे ?
अमुगेश्वरलिंगासी जाणलेल्या शरणासी
कोणी वंदिले, वा कोणी निंदिले तरी काय ? /1266 [1]

रायम्मा नावाच्या दोघी शरणी असून त्यांचे वचनांकितही एकच असल्यामुळे कोणते वचन कुणाचे हे ठरविणे कठीण जाते. तसेच अमुगे रायम्माला वरदानियम्मा म्हणूनही उल्लेखिलेले दिसून येते. शिवाय 'मसणय्यप्रिय मारेश्वरलिंग' या अंकिताचे एक वचन सापडले असून, ते बहुतेक तेलुगेश मसणय्याच्या पत्नीचे असावेसे वाटते. विद्वानांनी सूक्ष्म अभ्यास करून अमुगे रायम्माची ११६ वचने असल्याचे निश्चित केले आहे. ही मूळ सोलापूरची असून कल्याणला पतीबरोबर गेली व तेथील अनुभव मंटपात भाग घेऊ लागली. कल्याण क्रांतीनंतर ती महाराष्ट्रातील पुळजे गावी जाऊन तेथेच ऐक्य पावली. तिचे वचनांकित 'अमुगेश्वरलिंग' असून तिने आपल्या वचनांमध्ये सदाचरणाला अधिक महत्त्व दिले आहे. समाजातील दांभिकपणावर कठोर टीका केली आहे. काही वचनांत आत्मपरीक्षण असून आत्मज्ञानच गुरू म्हणून निर्धाराने तिने पुढे वाटचाल केल्याचे दिसून येते. ती कठोरवादिनी असून वेषधारी विरक्तांवर निर्भयपणे टीका करते. अज्ञानी लोकांचाही ती खरपूस समाचार घेते. विडंबनाद्वारे व वक्रोक्तीने ती समाजातील दांभिकपणावर आसूड ओढते. अंबिगर चौडय्याप्रमाणे ती निर्भीडपणे सर्व दोष उघड करते. त्यामुळे ती इतर शरणींपेक्षा वेगळी दिसते.

उत्तम घोडीच्या शिंगरूस नव्हे, तर -
काय गाढवीच्या पिलास खोगीर घालतील ?
अज्ञानींच्या हृदयात परमामृत सिंचन केले तरी,
परपीडा देऊन याचिल्याशिवाय ते राहतील ?
हत्तीची झूल पांघरलेल्या डुकराप्रमाणे भटकणा-या
अज्ञानींना काय म्हणावे अमुगेश्वरा ? /1267 [1]

References

[1] Vachanas selected from the book "VACHANA" (Edited in Kannada Dr. M. M. Kalaburgi), Marathi Version Translation by: Shri Shankar M. Patil, Smt. Savita S. Naadkatti. ISBN: 978-93-81457-10-8, 2012, Pub: Basava Samithi, Basava Bhavana Benguluru 560001.

सूचीत परत (index)
*
Previous अमुगिदेवय्या अरिविन मारितंदे Next