| एकांत रामितंदे :👈 | 👉:शरण आणी शरणे |
षट्स्थल चक्रवर्ती चिन्मयज्ञानी चन्नबसवण्णा |
| पूर्ण नाव: | चन्नबसवण्णा |
| वचनांकित : | कूडलचेन्नसंगमदेव |
| कायक (काम): | आचार्य पुरुष, दुसरे शून्य पीठासीन अधिकारी |
षट्स्थल चक्रवर्ती चिन्मयज्ञानी चन्नबसवण्णा
महात्मा बसवण्णांनी १२ व्या शतकात स्थापन केलेल्या अनुभव मंटपातील विचारधारा लिंगायत धर्मरूपात सूत्रबद्ध झाली. लिंगायत धर्म हा बसवादी शरणांनी प्रतिपादन केलेल्या अष्टावरण, पंचाचार आणि षट्स्थल या तात्त्विक सिद्धान्तावर भरभक्कमपणे उभा आहे. या धर्माने परशिवाला 'स्थल' या तात्त्विक संबोधनाने संबोधले असून शिव व जीव यास लिंगस्थल व अंगस्थल असे म्हटले आहे. शिव व जिवाच्या ऐक्याला लिंगांग सामरस्य अशी परिभाषा वापरतात. या लिंगांग सामरस्यास साह्यभूत असा साधनामार्ग म्हणजे षट्स्थल सिद्धान्त होय. अशा या षट्स्थल सिद्धान्ताचा सार्वभौम राजा, षट्स्थल चक्रवर्ती म्हणजे चेन्नबसवण्णा!
चेन्नबसवण्णा म्हणजे अविरळ ज्ञानी! स्वयंज्ञानी ! सम्यक ज्ञानी! शिवतत्त्व शिरोमणी ! प्रसादी पुरुष ! दिव्यमूर्ती! शरणतत्त्वश्री ! लिंगायत धर्मज्योती! संतकवी ! अत्युत्कृष्ट वचनकार ! सकलभूतहितनिरत महामानव! जन्मजात ज्ञानपरिमळभरित ! महान तत्त्वज्ञ! वयाने लहान असले तरी, षट्स्थल सिद्धान्ताचे अनभिषिक्त सम्राट !
चेन्नबसवण्णांची अलौकिक बुद्धिमत्ता आणि धैर्यशील जीवनसाधना यांच्यामुळे त्यांचे चरित्र अधिकच अलौकिक, दैवीमय करण्याच्या प्रयत्नात चरित्रलेखक वास्तवापासून दूर गेले आहेत. त्यामुळे चेन्नबसवण्णांच्या जीवनचरित्राभोवती आख्यायिकेचे गडद सावट पसरलेले दिसून येते. सिंगिराज पुराणाचा संदर्भ लक्षात घेता त्यातून काही वास्तववादी व ऐतिहासिक धागेदोरे हाती लागतात. सिंगिराज पुराणात वर्णन केल्याप्रमाणे चेन्नबसवण्णांचा जन्म नागलांबिका आणि शिवदेव या दांपत्याच्या पोटी झाला.
चेन्नबसवण्णांची आई अक्कनागलांबिका ही बसवण्णांची थोरली बहीण, मादिराज आणि मादलांबिका हे अक्कनागम्माचा विवाह इंगळेश्वर येथील शिवदेव यांच्याशी लावून देतात. बागेवाडी व इंगळेश्वर ही १० कि. मी. अंतरावरील गावे होत. बसवण्णा हे बागेवाडी सोडून कूडलसंगमला येत असताना शिवदेव आणि अक्कनागम्मा हेही कूडलसंगमला येतात व तिथेच स्थायिक होतात. बसवण्णा आणि अक्कनागम्मा यांच्यातील नाते रक्तसंबंधापेक्षा भक्तिसंबंधाने अधिक दृढ झाले होते. त्यामुळे अक्कनागम्मा ही बसवण्णा जिथे जिथे जातील, तिथे त्यांच्या ध्येयाची स्फूर्तिचेतना म्हणून राहिली आहे. त्यामुळे जन्मापासूनच चेन्नबसवण्णांस महात्मा बसवण्णांचा सहवास लाभला. तसे पाहता आईच्या गर्भाशयात असतानाच चेन्नबसवण्णांना बसवण्णांच्याकडून लिंगानुग्रह प्राप्त झाला होता. अक्कनागम्मा गर्भवती असताना आठव्या महिन्यात तिला बसवण्णांनी गर्भातील शिशूसाठी विधिवत इष्टलिंगदीक्षा दिली होती. स्वतः चेन्नबसवण्णाच आपल्या एका वचनात या घटनेचा उल्लेख करतात. चेन्नबसवण्णा हे उपजत ज्ञानी असले तरी, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत मामा बसवण्णांचा प्रभाव अत्यंत महत्त्वपूर्ण राहिला आहे.
चेन्नबसवण्णा हे अनुभव मंटपाच्या नभांगणात पूर्णत्व पावलेले ज्ञानचंद्र होत. चंद्राच्या कलेप्रमाणे ते अनुभव मंटपात घडत गेले.
पूर्णत्वाला पोहचले.
अनुभव मंटपातील चर्चा, संवाद, विचार-मंथन यातून चेन्नबसवण्णा परिपक्व अवस्थेला पोहचले. जन्मजात कुशाग्र बुद्धिमत्ता लाभल्यामुळे अनुभव मंटपातील ज्ञान ग्रहण करून स्वतंत्र चिंतन, मननाद्वारे नव्या विचारांची पेरणी त्यांनी केली. शरणांनी प्रतिपादन केलेल्या तत्त्वास नवा आयाम देऊन प्रभुदेवांच्या साक्षीने लिंगायत धर्म सिद्धान्तास चेन्नबसवण्णांनी अंतिम रूप दिले.
अनुभव मंटपाचे अध्यक्ष अल्लमप्रभू यांच्या अनुपस्थितीत चेन्नबसवण्णांनी अत्यंत यशस्वीपणे अनुभव मंटपातील कार्य पार पाडले. चेन्नबसवण्णांच्या अचाट बुद्धिमत्तेची साक्ष अनेक घटनांवरून प्रचितीस येते. अल्लमप्रभू आणि सिद्धराम यांचे महामनेत आगमन, नुलिय चंदय्यांचे लिंग हरवणे, अक्का महादेवीची अल्लमप्रभूनी घेतलेली परीक्षा, सिद्धरामांना इष्टलिंगदीक्षा देण्यासंदर्भात संवाद व सिद्धरामांना इष्टलिंगदीक्षा प्रदान करणे इत्यादी सर्व घटनांतून चेन्नबसवण्णांच्या अविरळ ज्ञानाचे दर्शन घडते. चेन्नबसवण्णांठायी असलेल्या ज्ञानापुढे सिद्धरामांसारखा महान शिवयोगी नतमस्तक होऊन अभिमानाने त्यांचे गुरुत्व मिरवतो. अल्लमप्रभूसारखे महानुभावी चेन्नबसवण्णांच्या ज्ञानशक्तीचा महिमा गातात. अल्लमप्रभूचे पुढील वचन पहा, -
वयाने लहान किंवा मोठा असले तरी काय होई? ज्ञान कधी लहान-मोठे असू शकते का? गुहेश्वरलिंगाठायी तूच एक महाज्ञानी असल्याचे मला उमजले असे.
चेन्नबसवण्णा हे अत्युत्कृष्ट वचनकार, प्रतिभासंपन्न कवी. चेन्नबसवण्णांची वचने ही वचन साहित्यातील तात्विक भूमिका स्पष्ट करणारे महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहेत. अतिशय गहन विषयही सरळ, सुलभ पद्धतीने प्रतिपादन करण्याची हातोटी चेन्नबसवण्णांना लाभली होती. षट्स्थलाविषयी त्यांची वचनरचना साधकाला दीपस्तंभासारखी मार्गदर्शक आहे. सुंदर, परिपूर्ण, समृद्ध समाज निर्माणासाठीच त्यांनी अष्टावरण, पंचाचार व षट्स्थल इत्यादी विषयी आपल्या वचनांतून सोप्या भाषेत मार्गदर्शन केले आहे.
चेन्नबसवण्णांची १७६३ वचने आजवर उपलब्ध झाली असून ८४२ षट्स्थल वचने आणि ९२१ अधिकची वचने म्हणून प्रसिद्ध पावली आहेत. कर्नाटक सरकारने प्रकाशित केलेल्या समग्र वचन संपुट-३मध्ये या वचनांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय करणहसिगे, मिश्रार्पण, हिरिय मंत्रगोप्प, पद मंत्रगोप्य, सकीलद वचन, स्वरवचन, कालज्ञान वचन-१,२,३, दीक्षाविधान व घटचक्र इत्यादी वचनेतर साहित्य अशी ग्रंथसंपदा त्यांच्या नावे आहे. 'कूडलचेन्नसंगमदेव' या वचनांकिताने त्यांनी केलेली रचना कन्नड साहित्यसृष्टी समृद्ध करणारी असून वचन साहित्यातील अद्भुत ज्ञानसंपदा आहे.
सरळता, सहजता यानी अलकृत झालेली त्यांची वचने मनाचा ठाव घेतात. शरणांची तत्त्वे आणि आपले आचरण यातील विसंगती ते निर्भयपणे स्पष्ट करतात.
विचारांच्या प्रगल्भतेमुळे वचनरचनेत स्पष्टता, प्रखरता व निर्भयता प्रतिबिंबित होते. त्यांनी योजिलेल्या उपमा उपमातीत अशाच आहेत. चेन्नबसवण्णांच्या वचनांत भक्तिरसाचा शृंगार, ज्ञानाचे अधिष्ठान, अनुभावाची झालर आहे. समाजहिताची आंतरिक तळमळ आहे. तसेच, बसवण्णांच्या अभूतपूर्व समग्र क्रांतीस सैद्धान्तिक अधिष्ठान प्राप्त करून देण्याची जबाबदारी आहे.
महात्मा बसवण्णांनी इष्टलिंग हे लिंगांग सामरस्य साधण्यासाठी दिले. परंतु, सामान्य लोक मात्र ते विसरून केवळ पूजेतच मग्न झाले आहेत. या आशयाचे त्यांचे
वचन पाहा, -
ज्ञान जाणून घेण्यास सांगून,
सद्गुरुनाथांनी हाती लिंग दिले (नाही का?) आपले ज्ञान विसरून लिंगच पुजणारी
मानवरूपी मेंढरे पहा, कूडलचेन्नसंगमदेवा.
इष्टलिंग हे परशिवरूपी साध्य गाठण्यासाठीचे साधन आहे. परंतु हा मानव त्या साधनालाच साध्य समजून त्याच्या पूजनातच वेळ घालवत आहे, अशी खंत चेन्नबसवण्णा या वचनातून व्यक्त करतात.
चेन्नबसवण्णांनी आपल्या वचनांतून समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, दांभिकता, कर्मकांड इत्यादींवर ताशेरे ओढून सत्यपथ दाखवला आहे. काही लोक त्रिकाल पूजेचा नेम करतात. त्यातून मुक्तीची अपेक्षा करतात. त्यांना चेन्नबसवण्णांनी विचारलेला सवाल धर्मव्यवस्थेतील अवडंबराला तिलांजली देणारा आहे.
पहाटेची पूजा, दिवसाची पूजा, तिन्हीसांजेची पूजा,
नित्य-नित्य पुजुनी व्यथित झाले सारे.
निश्चिंत, प्रशांत, निजैक्यलिंग
त्या त्या वेळी आणता येईल का?
वेळच पुजुनी,वेळेचीच अर्चना करुनी
इकडचेच झाले सारे.
निश्चिंतता जाणून निजस्थिती प्राप्त करता, सुचित्त समाधान होय. कूडलचेन्नसंगरूपी लिंग निश्चिंत निजैक्य होय.
वेळ पाहून त्रिकाल पूजा करणारे हे त्या इष्टलिंगाची पूजा करीत नाहीत, तर ते वेळेची पूजा करीत असतात. कारण पूजेत निश्चिंतता, प्रशांतता, निजैक्यता, समरसता त्या त्या वेळी आणणे शक्य नाही. म्हणून वेळेची पूजा करण्यापेक्षा निश्चिंत होऊन समाधानाने पूजा करावी. त्यातच सामरस्याचा आनंद साठलेला असतो असे चेन्नबसवण्णा सांगतात.
चेन्नबसवण्णांनी आपल्या वचनातून लिंगायत आचार-पद्धतीवर अधिक भर दिला आहे. इष्टलिंग धारण केलेल्यांनी आपले जीवन कसे जगावे याचा आदर्श पाठ ते आपल्या वचनांतून घालून देतात. लिंगायतांनी विवाहाप्रसंगी कसे आचरण करावे याचे विवेचन करणारे हे वचन पहा.-
लिंगधारी शिवभक्तांच्या विवाहप्रसंगी
शिवशरणगणांना विभूती लेपून, पान आणि भोजन देऊन, शिवशरणांच्या साक्षीने शिवप्रसाद वितरण करणे हाच सदाचार होय.
असे न करता, वार, तिथी, सुमुहूर्त इत्यादी लौकिक कर्म केल्यास,
कूडलचेन्नसंगमदेवाच्या सद्भक्तांपासून दूर होतील खास.
लिंगायत संस्कृती ही पंचांग, ज्योतिष, वार, तिथी, मुहूर्त इत्यादी काहीही जाणत नाही. विवाहाचे आमंत्रण देत असताना विभूती दिली पाहिजे. विवाहास उपस्थित शरणांना अन्नदासोह करून तृप्त करावे. आदराने त्यांचे स्वागत करावे. ज्या वेळी आपण सर्व जण एकत्र येतो, तोच सुमुहूर्त, तिथी होय. त्यासाठी वेगळे पंचांग पाहून वार, तिथी निश्चित करण्याची गरज नाही. लिंगायतांनी कुठल्याही प्रसंगी वार, तिथी, मुहूर्त पाहू नये असा स्पष्ट खुलासा चेन्नबसवण्णांनी आपल्या वचनातून केला आहे. आणखी एका वचनातून वार, कुल, गोत्र यांचे निराकरण करताना चेन्नबसवण्णा म्हणतात, -आठवड्याचे दिवस सात आणि जाती अठरा (पगड) असे म्हणतात, हे आम्हांला मान्य नाही.
आम्ही त्यास नाही असे म्हणतो.
कारण, रात्र एक वार, दिवस एक वार आहे.
भवीचे एक कुल-गोत्र आणि भक्ताचे एक कुल होय.
एवढेच आम्ही जाणतो पहा, कूडलचेन्नसंगमदेवा.
शरणांनी ज्ञान आणि क्रिया यांना एकरूप केले आहे. ज्ञानविरहित क्रिया ही आंधळी आहे, क्रियाविरहित ज्ञान हे पांगळे आहे. ज्ञान आणि क्रियेचे सामरस्यच शरण संस्कृती होय. या संदर्भातील चेन्नबसवण्णांचे वचन अत्यंत बोलके आहे.
क्रिया म्हणजे ज्ञान आणि ते ज्ञान हीच क्रिया,
ज्ञान म्हणजे समजणे, क्रिया म्हणजे समजल्यानुसार करणे.
परस्त्रीला भोगू नये हे ज्ञान होय.
त्यानुसार आचरणात आणणे ही क्रिया होय, अतः आचरण नाही केल्यास तेच अज्ञान होय.
कूडलचेन्नसंगमदेवा.
आपल्याला झालेल्या ज्ञानाचे क्रियेत रूपांतर झाले, अथवा त्याप्रमाणे आचरण केले, तरच ते ज्ञान होय. आचरणात नसलेले ज्ञान अज्ञान होय, असे ते म्हणतात. या संदर्भाच्या पुष्टीसाठी त्यांनी दिलेले उदाहरण समर्पक आहे. शरणांनी परस्त्री, परधन व परदैवत यांचा विटाळ मानला आहे. परस्त्री संग करू नये हे आपणास ज्ञात असते. तरीही सामान्य लोक विषयलोलुप होऊन त्याच्या आहारी जातात. मग त्यांना ज्ञान आहे हे कसे व्हावे? परस्त्री भोगू नये याचे ज्ञान असणे जितके महत्त्वाचे आहे, तेवढेच त्याप्रमाणे प्रत्यक्ष आचरण केले पाहिजे असा अट्टाहास चेन्नबसवण्णा धरतात. परस्त्री ही प्रत्यक्ष महादेवी आहे. ही बसववाणी आचरणात आणून ज्ञान आणि क्रिया यांचे सामरस्य घडवतात.
जंगम कसा असावा? याचे चित्रण चेन्नबसवण्णा आपल्या एका वचनात करताना म्हणतात, -
भगवी कफनी घातलेला जंगम असे का?
कर्णकुंडल, हस्तमुद्रिका बाळगलेला जंगम असे का? केवळ संन्यासी सारे जंगम असती का?
नवजन
वेषधारी सारे जंगम असती का?
अज्ञानी सारे जंगम असती?
भूभारी सारे जंगम असती? नव्हेत.
जंगम कोण म्हणजे,
सीमा नसलेला निस्सीम हा जंगम, आशा नसलेला निरासक्त हा जंगम, चिंता नसलेला निश्चिंत हा जंगम, अशा जंगमाची चाहूल न लागल्याने कूडलचेन्नसंगय्या स्वतःच जंगम झाला.
भगवी कफनी घातलेले, कर्णकुंडल, हस्तमुद्रिका धारण करणारे, संन्यासी, वेषधारी, अज्ञानी ह्यांना जंगम म्हणता येणार नाही. कारण ते स्वार्थासाठी फक्त वेषधारी झाले आहेत. त्यांचे आचरण हे निस्सीम झाले नाही. ते सदैव स्त्री, सोने, घरदार यांच्या चिंतेत राहतात. ते निश्चिंत झाले नाहीत. वरी भगवा झाले असले तरी, अंतरी कामवासना विझलेली नाही. त्यामुळे ते विषयासक्त आहेत. चेन्न-बसवण्णांना अभिप्रेत असलेला जंगम सापडणे दुर्मिळच आहे. म्हणून शेवटी ते कूडल चेन्नसंगय्या स्वतःच जंगम झाला असे म्हणतात.
चेन्नबसवण्णांनी आपल्या वचनांतून बसवादी शरणांचे स्मरण केले आहे. त्यांचा महिमा गायिला आहे. महात्मा बसवण्णांचे वर्णन तर चेन्नबसवण्णांच्या अधिक वचनात आढळून येते. म. बसवण्णांच्या विशाल कार्यकर्तृत्वाचा उलगडा चेन्नबसवण्णांच्या वचनांतून होतो. 'मी अनादी काळापासून तुमच्या करुणेचा शिशू आहे' असे सांगून बसवण्णाच माझे गुरू आहेत व मी त्यांचे शिष्यत्व पत्करल्याचा दाखला ते स्वतःच देतात.
महात्मा बसवण्णांच्या पूर्वीही इष्टलिंग होते म्हणून प्रतिवाद करणाऱ्या पक्षाला खुद्द चेन्नबसवण्णांनीच आपल्या वचनातून उत्तर दिले आहे असे ते म्हणतात, -
आदी बसवण्णा, अनादी लिंग,
हे खोटेनाटे मज ऐकवत नाही.
आदी लिंग, अनादी बसवण्णा.
बसवण्णांच्या उदरात लिंग जन्मले,
बसवण्णांच्या उदरी जंगम जन्मले, प्रसाद जन्मला.
या त्रिविधास बसवण्णाच कारणीभूत, कूडलचेन्नसंगमदेवा.
महात्मा बसवण्णांनी आपल्या सामाजिक समतेचे सूत्र म्हणून इष्टलिंग प्रत्येकाच्या करस्थळी दिले. बसवण्णांच्या अगोदर स्थावरलिंग होते. परंतु, इष्टलिंग बसवण्णांच्या उदरीच जन्मले असल्याकारणे बसवण्णा हे इष्टलिंगजनक आहेत, जंगम आणि प्रसाद यांचे कर्तेही बसवण्णाच आहेत, असा स्पष्ट खुलासा चेन्नबसवण्णा आपल्या वचनातून देतात. चेन्नबसवण्णांच्या वरील काही वचनांचा सारांश लक्षात घेता, ही वचने लिंगायत सिद्धान्ताचे प्रतिपादन करणारी आहेत हे ठळकपणे दिसून येते. षट्स्थल सिद्धान्त हा चेन्नबसवण्णांच्या वचनांचा गाभा आहे.
महात्मा बसवण्णांनी आपल्या एका वचनात क्रमाक्रमाने भक्त, महेश, प्रसादी, प्राणलिंगी, शरण आणि ऐक्य हे सोपान चढून जाईन असे म्हटले आहे. ही रीत चेन्नबसवण्णांना अमान्य होती. त्यांच्या मते, प्रत्येकाने आपण ज्या स्थलात आहोत, तेथूनच ऐक्याकडे मार्गक्रमण केले पाहिजे. म्हणूनच 'चेन्नबसवण्णा म्हणजे ज्ञानाचे अधिष्ठान असून षट्स्थलाची प्रतिमा आहेत.' असे एलेश्वर केतय्या म्हणतात.
महात्मा बसवण्णांनी सुरू केलेले मानव उत्थानाचे कार्य चेन्नबसवण्णा, अल्लमप्रभू, अक्कमहादेवी, सिद्धराम यांच्यासह ७७० शरणांच्या त्यागातून बहरत असतानाच शीलवंत आणि लावण्यवती यांच्या विवाहामुळे उद्भवलेल्या सनातन्यांच्या रोषातून कल्याणमध्ये प्रतिक्रांती घडली. बसवण्णा राज्यत्याग करून कूडलसंगमला गेले. बिज्जळाचा खून झाला. शरणांची कत्तल सुरू झाली. वचनसाहित्य भांडारास आग लावण्यात आली. वचन साहित्याच्या रक्षणार्थ शरण शरणींचा एक गट अल्लमप्रभूच्या नेतृत्वात श्रीशैलच्या कदळीबनाकडे निघाला. तर दुसरा गट चेन्नबसवण्णांच्या नेतृत्वाखाली उळवीच्या दिशेने निघाला. त्यात अक्कनागम्मा, गंगांबिका, कल्याणी, मडिवाळ माचीदेव, कक्कय्या, रुद्रमुनी, किन्नरी बोम्मय्या, नुलिय चंदय्या, अंबिगर चौडय्या, लिंगम्मा, गौरम्मा, काळव्वे अशा असंख्य शरणांचा ताफा होता. चेन्नबसवण्णा या सर्वांना सोबत घेऊन वचन साहित्य रक्षणासाठी जिवाचे बलिदान करण्यास सिद्ध झाले. सिद्धराम आणि दानेश्वरी यांनी या गटास मोलाचे साह्य दिले. उळवीच्या जंगलात आश्रय घेण्याचा सल्ला देऊन दानेश्वरीने चेन्नबसवण्णांना मदत केली. राजा सोविदेवाच्या सैन्याला चुकवत घनदाट अरण्यात शरणांचा हा जथ्था उळवीच्या दिशेने निघाला. कादरोळी येथे सोविदेव आणि शरण यांच्यात युद्ध पेटले. त्यात बसवपत्नी गंगांबिका धारातीर्थी पडल्या. चेन्नबसवण्णांच्या गटातील एक-एक तारा निखळत होता. या सर्व संघर्षमय परिस्थितीशी सामना करत चेन्नबसवण्णा आपल्या गटासह मोठ्या धैर्याने वचन साहित्य घेऊन आगेकूच करत होते. सुमारे सातशे किलोमीटरच्या दुर्गम खडतर प्रवासानंतर काही मातब्बर मंडळीच शिल्लक राहिली होती. वीरमरण पत्करलेल्या शरणांच्या आठवणींनी स्फूर्तीही मिळत होती अन् दुःखही होत होते. जखमी झालेल्यांना उपचार करत, वृद्धांना सावरत, हिंस्र श्वापदांना चुकवत चेन्नबसवण्णा मार्गक्रमण करत राहिले. उळवीत पोहचले तर, सुसाट वारा, धो-धो पाऊस, दुर्गम अरण्य, हिंस्र श्वापदे अशा कठीण परिस्थितीला तोंड देत त्यांनी शरणांची देखभाल केली. या प्रतिकूल परिस्थितीत चेन्नबसवण्णांचे शरीर साथ देत नव्हते. अंगात उष्ण गोळ्यासारखा ताप भरला होता. पायात त्राण उरले नव्हते. उळवीच्या गुहेतच वचन साहित्य सुरक्षित ठेवून चेन्नबसवण्णा समाधान पावले. हाती घेतलेले काम फत्ते झाले म्हणून सुस्कारा टाकला आणि एका काळरात्री ते लिंगनिद्रेत गढून गेले. उळवीच्या घनदाट अरण्यात षट्स्थलाचा ज्ञाता पहुडला. एक धीरोदात्त, ज्ञानवंत, धैर्यवंत महापुरुष म्हणून अवघ्या २४ वर्षात त्यांनी केलेली साधना आकाशाला गवसणी घालणारी आहे. चेन्नबसवण्णा ज्ञान, भक्ती आणि वैराग्य यांचा हिमालय पादाक्रांत करून शरण साहित्याच्या इतिहासात षट्स्थल चक्रवर्ती म्हणून अजरामर झाले आहेत.
शरणु शरणार्थी🙏🙏🙏
| एकांत रामितंदे :👈 | 👉:शरण आणी शरणे |