*
लिंगायतमध्ये देवलोक, मर्त्यलोक
देवलोक, मर्त्यलोक असे असती का वेगळे ?
या लोकीच पुन्हा अनंत लोक? ।
एकच शिवलोक नि एकच शिवाचार हो.
शिवभक्त असलेले स्थळच देवलोक,
भक्ताचे अंगणच वाराणसी, कायाच कैलास,
हे सत्य असे, कुडलसंगमदेवा. / 232 [1]
शरणांची निद्रा हाचि जप पहा देवा.
शरणांचे जागरण ही शिवरात्र पहा,
शरण चाललेली भूमी पवित्र क्षेत्र पहा,
शरणांची वाणी शिवतत्त्व पहा,
कुडलसंगमदेवाच्या
शरणांची काया हाच कैलास पहा. /363 [1]
अंगावर लिंगसंबंध होता तीर्थक्षेत्राला का हो जावे !
अंगावरील लिंगास स्थावर लिंग स्पर्शिता,
कोणते महान आणि कोणते सान म्हणावे !
शब्दातीत परात्परास न जाणल्याने वाया गेले.
जंगमदर्शन हे नतमस्तक होता पावन,
लिंगदर्शन हे करस्पर्शाने पावन.
समीपचे लिंग हीन लेखून,
दूरच्या लिंगास नमन करणा-या
व्रतहीनांना दाखवू नका हो, कूडल चेन्नसंगय्या. /653 [1]
दूध असताना लोणी का शोधावे बरे ?
लिंग असताना पुण्य-तीर्थस्थानाला का जावे बरे ?
लिंगसंग केला असे म्हणणा-यांना
अन्य देवाचे भजन कशाला हो ?
इष्टलिंगमविश्वस्य योऽन्यदैवमुपासते।
श्वानयोनिशतं गत्वा चांडालगृहमाचरेत् ।। असे असल्याने,
अशा पातक्यांना घोर नरक चुकत नाही पहा,
कूडल चेन्नसंगमदेवा. /934 [1]
भक्ताला गरीबी असते का ? सत्यवंताला कर्म असते का ?
चित्त शुद्ध ठेवून कायकसेवा करणा-या भक्ताला
मर्त्यलोक, कैलास असे असते का ?
तो राहत असलेले स्थळच सुक्षेत्र असते.
त्याचे अंगच अमरेश्वरलिंगाचे संगसुख आहे. /1526 [1]
वाराणसी अविमुक्त तीर्थक्षेत्र इथेच आहे.
हिमालयातील केदार, विरूपाक्ष इथेच आहे.
गोकर्ण, सेतुरामेश्वर इथेच आहे.
श्रीशैल मल्लिनाथ इथेच आहे.
सकल पुण्यक्षेत्रे इथेच आहेत.
सकल लिंग उळियुमेश्वर आपल्यातच आहे. /1595 [1]
खया शिवैक्याला सकाळी अमावस्या,
भर दुपारी संक्रांती, आणि संध्याकाळी पौर्णिमा.
भक्ताचे घर अंगण हेच वाराणसी पहा, रामनाथा. /1714 [1]
देणारा माणूस आहे म्हणतात,
त्याचे थोबाड खेटरांनी रंगवा.
माणसाच्या हृदयात शिरून,
ईश्वर त्याला वाटेल तितके देतो, देवराय सोडळ. /2115 [1]
[1] Vachanas selected from the book "VACHANA" (Edited in Kannada Dr. M. M. Kalaburgi), Marathi Version Translation by: Shri Shankar M. Patil, Smt. Savita S. Naadkatti. ISBN: 978-93-81457-10-8, 2012, Pub: Basava Samithi, Basava Bhavana Benguluru 560001.
*