Previous लिंगायतमध्ये आपल्या लिंगाचा नित्यनेम आपणचि करावा लिंगायतमध्ये देहच देऊळ Next

लिंगायतमध्ये स्वर्ग, नरक

सूचीत परत (index)
*

लिंगायतमध्ये स्वर्ग, नरक

देवलोक, मर्त्यलोक असे नसती हो वेगळे !
सत्य बोलणेच देवलोक, असत्य बोलणेच मृत्युलोक.
सदाचारच स्वर्ग, दुरांचारच नरक.
कुडलसंगमदेवा, याला तुम्हीच प्रमाण. /231 [1]

देवलोक, मर्त्यलोक असे असती का वेगळे ?
या लोकीच पुन्हा अनंत लोक? ।
एकच शिवलोक नि एकच शिवाचार हो.
शिवभक्त असलेले स्थळच देवलोक,
भक्ताचे अंगणच वाराणसी, कायाच कैलास,
हे सत्य असे, कुडलसंगमदेवा. / 232 [1]

कैलास नि मृत्युलोक म्हणती
कैलास म्हणजे काय, नि मृत्युलोक म्हणजे काय ?
तेथील चालचलनही एकाच प्रकारचे,
येथील चालचलनही एकाच प्रकारचे;
तेथील शब्द-भाषा एकाच प्रकारची,
येथील शब्द-भाषा एकाच प्रकारची
पहा असे म्हणती हो.
कैलासीच्यांना देवकळायुक्त म्हणती,
मृत्युलोकीच्यांना महागण ऐसे म्हणती.
सुरलोकी युगे लोटली, तरी नाश नाही म्हणती,
नरलोकी पुन:पुन्हा मरून जन्मतात म्हणती.
हे सारे पाहून आमचे शरणगण
सुरलोक आणिक नरलोक तृणवत मानून,
भव पार करून, आपापल्या जन्माचे मर्म जाणून,
महाप्रकाशात सामावून,
त्या प्रकाशातच विलीन जाहले,
अप्पण्णप्रिय चेन्नबसवण्णा. /1361 [1]

तळहातावर लिंग असताना तो हातच कैलास, ते लिंगच शिव,
म्हणून इथेच कैलास आहे.
यापेक्षा वेगळ्या रजताद्रीला कैलास म्हणून
तेथील रुद्राला शिव म्हणत कैलासाला गेलो-आलो
असा भ्रम ठेवू नका अण्णा.
देहाचा अनुग्रह, लिंगावर श्रद्धा ठेवली नाही तर,
आणखी कोठे श्रद्धा ठेवणार आहे ?
इकडे तिकडे भटकून नष्ट होऊ नका, ऐका अण्णा.
अंगातच लिंगांग सामरस्य करुनी आत बाहेर एक होऊन रहा.
अग्निस्पर्शाने कापूर जळल्यासम, लिंगस्पर्शाने
सर्वांगातील अंगभाव जाऊन लिंगभावात तन्मय व्हावे,
त्यातील परमसुख उपमातीत आहे, सौराष्ट्र सोमेश्वरा. / 1482 [1]

[1] Vachanas selected from the book "VACHANA" (Edited in Kannada Dr. M. M. Kalaburgi), Marathi Version Translation by: Shri Shankar M. Patil, Smt. Savita S. Naadkatti. ISBN: 978-93-81457-10-8, 2012, Pub: Basava Samithi, Basava Bhavana Benguluru 560001.

सूचीत परत (index)
*
Previous लिंगायतमध्ये आपल्या लिंगाचा नित्यनेम आपणचि करावा लिंगायतमध्ये देहच देऊळ Next