Previous लिंगायतमध्ये पुरुष स्त्री समानता वचन साहित्याच लिंगायत धर्माची संहिता Next

लिंगायत धर्मगुरु गुरु बसव

सूचीत परत (index)

लिंगायत धर्मगुरु गुरु बसव

कल्याणरूपी पणतीत भक्तिरसरूपी तेल ओतुनी,
सदाचाराच्या वातीस स्पर्शिता बसवण्णारूपी ज्योती,
झगमगतो हो शिवप्रकाश !
ह्या प्रकाशात विराजिती असंख्यात भक्तगण.
शिवभक्त असलेले क्षेत्रच पुण्यक्षेत्र हे असत्य आहे का ?
शिवभक्त असलेला देश पावन हे असत्य असे का ?
मम परमाराध्य संगनबसवण्णास
गुहेश्वरलिंगात पाहून कृतार्थ होई जीवन,
पहा हो सिद्धरामा. /496 [1]

अंगास माती न चिकटणा-या
कीटकापरी तू असशी ना बसवण्णा.
जलाशयातील कमळापरी ।
जलापासून निर्लिप्त तू असशी ना बसवण्णा.
जलोद्भव असूनही जळी न विरघळणा-या
मौक्तिकापरी तू असशी ना बसवण्णा.
तनुगुणांनी उन्मत्त नि ऐश्वर्याने अंध
झालेल्यांच्या संप्रदायाची,
गुहेश्वरलिंगाच्या आज्ञेने कशी केलीस दैना,
हे संगनबसवण्णा ? /509 [1]

सतीसंगे राहूनही व्रती जाहला बसवण्णा.
व्रती होऊनी ब्रह्मचारी जाहला बसवण्णा.
ब्रह्मचारी होऊनी भवमुक्त जाहला बसवण्णा.
गुहेश्वरा, तव ठायी एक बसवण्णाच
जाहला बालब्रह्मचारी, /618 [1]

बसवण्णांनी येऊनी मर्त्यलोकी स्थापिले महामने,
प्रकटवून दाखविता भक्ति-ज्ञानरूपी ज्योत,
सुज्ञानरूपी प्रभा पसरली जगात.
जाणून पाहता त्या प्रकाशात,
जमून एकत्रित झाले हो विखुरलेले शिवगण सारे.
कूडल चेन्नसंगमदेवा, तव शरण बसवण्णांच्या कृपेने
प्रभुदेवांचे स्वरूप जाणून
निश्चिंत झाले हो शिवगण सारे. /840 [1]

मांसपिंड न म्हणविता मंत्रपिंड म्हणविले बसवण्णांनी,
वायुप्राणी न म्हणविता लिंगप्राणी म्हणविले बसवण्णांनी,
जगभरित या शब्दाची इच्छा न करता ।
शरणभरितलिंग म्हणवून घेतले,
कूडल चेन्नसंगय्याठायी बसवण्णांनी. / 872 [1]

सुवर्णाकरिता आलेले नव्हे, स्त्रीकरिता आलेले नव्हे,
अन्नाकरिता आलेले नव्हे, वस्त्राकरिता आलेले नव्हे,
कूडल चेन्नसंगय्या,
भक्तिपथ दाखविण्यासाठी आले हो, बसवण्णा. /939 [1]

तनाच्या आधारे दासोह करून गुरुप्रसादी झाले बसवण्णा.
मनाच्या आधारे दासोह करून लिंगप्रसादी झाले बसवण्णा.
धनाच्या आधारे दासोह करून जंगमप्रसादी झाले बसवण्णा.
ऐशा त्रिविध आधारे दासोह करून,
सद्गुरु कपिलसिद्ध मल्लिकार्जुना,
तुमचे शरण बसवण्णा स्वयंप्रसादी झाले हो ! /1015 [1]

कामांतकासी जिंकिले बसवा, तव कारणे.
शशिधरासी वश केले बसवा, तव कृपेने.
संबोधन नारी ऐसे, म्हणून काय जाहले ?
भावात असे नररूप बसवा, तव दयेने.
अतिकामी चेन्नमल्लिकार्जुनासी आव्हान देऊन,
द्वैत विसरून समरसले बसवा, तव कृपेने. /1161 [1]

तोंडातली चव थुकून ती परत गिळता येते काय ?
डोळ्यातले रूप वेगळे करून बघता येते काय ?
हातातली वस्तू टाकून पुन्हा घेता येईल काय ?
आपल्यात असलेले परमतत्त्व
वेगळे करून शोधता येईल काय ?
रेकण्णप्रिय नागिनाथा,
हे जग टिकून राहिले, ते बसवण्णांमुळे./ 1841 [1]

बसवाचे नाव कामधेनू बघा हो,
बसवाचे नाव कल्पवृक्ष बघा हो,
बसवाचे नाव चिंतामणी बघा हो,
बसवाचे नाव परीसमणी बघा हो,
बसवाचे नाव संजीवनी मूळ बघा हो.
असे हे बसवामृत,
माझ्या जिभेवर भरून, उतून, मनात भरले.
ते मन भरून, उतून, सर्व करणेंद्रियात साठले.
ती सर्व करणेंद्रिये भरून, उतून
सर्वांगाच्या रोमरोमात भिनले; म्हणून
मी बसवाक्षराचे जहाज चढून,
बसव बसव बसवा म्हणत
भवसागर ओलांडला हो अखंडेश्वरा /2480 [1]

बसवण्णाच माझी माता, बसवण्णाच माझे पिता,
बसवण्णाच परमबंधू मला.
वसुधीश कपिलसिद्ध मल्लिकार्जुन,
तुम्ही नाव ठेवलेले गुरूच बसवण्णा (सि. व. सं. ४-८०९)

दृष्टिची भक्ती बसवांच्या मुळे झाली;
शरणसंघाचे ज्ञान बसवांच्या मुळे झाले,
कुठले शिवज्ञान कुठले संगकार्य बसवा विना?
महाज्ञान व महाप्रकाशच बसवण्णांचा धर्म हो,
कपिलसिद्ध मल्लिनाथय्या (सि.व.सं.-७४७)

करुणाकर बसवा, कालहर बसव, कर्महर बसवा,
निर्मळ बरवा, शिवज्ञानी बसवा,
तुमचा धर्म हो, हा भक्तिचा मार्ग.
करूणाकार कपिलसिद्धृ मल्लिनाथा,
तुम्हा आम्हा बसवण्णाच धर्म हो.(सि. व. सं. ४३४ )

ब वदता माझा भवपाश मिटला
स वदता सर्वज्ञानि झाले मी
व वदता वस्तुचैतन्यातम्क झाले
असे बसवाक्षर त्रय मम सर्वांग
व्यापून झळकणारे भेद जाणून
मी तू (देव) ’बसवा’ ’बसवा’ ’बसवा’
म्हणत आहेत गुहेश्वर (अ.प्र. व.सं. 1372)

चन्नसंगा तुम्हापाशी कामना करून मागतो,
बसवा परी संपत्ति मिळणे मला
चन्नसंगा तुम्हापाशी कामना करून मागतो,
बसवा परी परीस मिळणे मला
चन्नसंगा तुम्हापाशी कामना करून मागतो,
बसवा परी कामधेनू मिळणे मला
चन्नसंगा तुम्हापाशी कामना करून मागतो,
बसवा परी कल्पवृक्ष मिळणे मला
चन्नसंगा तुम्हापाशी कामना करून मागतो,
त्रिविधाचा प्रथमदावलेला बसवण्णा मिळणे मला
चन्नसंगा तुम्हापाशी कामना करून मागतो,
बसवणामूळे तुम्ही (देव) झाल्याकारणे
कूडलचेन्नसंगय्यात प्रसादीचा प्रसादी झाले मी. (च.ब.व.0201)

बसवगूरूंचे नाव न जाणलेला आहे कोण?
खोटे बोलून नाश पावू नका
लिंगायताचा कर्ता बसवण्णाच हो. (क्रांति कवि सर्वज्ञ)

*

[1] Vachanas selected from the book "VACHANA" (Edited in Kannada Dr. M. M. Kalaburgi), Marathi Version Translation by: Shri Shankar M. Patil, Smt. Savita S. Naadkatti. ISBN: 978-93-81457-10-8, 2012, Pub: Basava Samithi, Basava Bhavana Benguluru 560001.

सूचीत परत (index)
Previous लिंगायतमध्ये पुरुष स्त्री समानता वचन साहित्याच लिंगायत धर्माची संहिता Next