लिंगायतमध्ये वेद, आगम, शास्त्र, पौराणिक कथा पेक्षा शरण वाचना चांगले, शरणांनी वचन सर्वोत्तम
आद्यांचे वचन परिसासम असे पहा :
तेच सदाशिवलिंग, असा विश्वास ठेवावा,
विश्वास ठेवताच तू विजयी पहा.
अधरास कडू, उदरास गोड,
कुडलसंगाच्या शरणांचे वचन
कडूलिंब चाखल्यागत. /39 [1]
वेद म्यानबंद करेन, शास्त्र जेरबंद करेन,
तर्काची पाठ चाबकाने सोलीन,
आगमाचे नाक छाटेन, पहा हो.
महादानी कुडलसंगमदेवा,
मी मादार चेन्नय्याचा घरचा पुत्र आहे देवा. / 359 [1]
वेद थरारले, शास्त्रे बाजूला हटली !
तर्कही अतर्य होऊन मूक झाले !
आगमही हटून दूर सरले !
कारण आमच्या कुडलसंगमदेवाने
मादार चेन्नय्याच्या घरी भोजन केले. /360 [1]
वेदपठणाचा काय उपयोग ?
शास्त्र ऐकल्याचा काय उपयोग ?
जप केल्याचा काय उपयोग?
तप केल्याचा काय उपयोग?
काही केले तरी काय,
आमच्या कुडलसंगय्याच्या मनास भिडल्याविना ? /361 [1]
शास्त्राला महान म्हणावे ? कर्माची पूजा करते.
वेदास महान म्हणावे ? प्राणिवध सांगते.
श्रुतीस महान म्हणावे ? समोर ठेवून शोधते.
तिथे कुठेही तुम्ही नसल्या कारणाने,
त्रिविध दासोहाविना अन्यत्र कोठेही पाहू नये
कुडलसंगमदेवास. /364 [1]
अज्ञानरूपी पाळण्यात,
ज्ञानरूपी शिशुस निजवुन,
सकल वेदशास्त्ररूपी दोर बांधून,
जोजविते अंगाई गात,
भ्रांतीरूपी माय !
पाळणा मोडून, दोर तुटून,
अंगाई गीत थांबल्याविन,
गुहेश्वरलिंगाचे ना होई दर्शन. /447 [1]
वेद ही ब्रह्माची अतिरंजित आत्मप्रौढी.
शास्त्रे म्हणजे सरस्वतीचे वादंग.
आगम म्हणजे ऋषीचा वेडाचार.
पुराणे म्हणजे पूर्वजांचे भांडणतंटे.
अशा ह्यांच्या जाणकारांना धिक्कारून,
सहज स्वरूपात स्थित होणाराच
गुहेश्वराठायी परिशुद्ध लिंगैक्य. /607 [1]
वेद नव्हे प्रमाण, शास्त्र नव्हे प्रमाण,
शब्द प्रमाण नव्हे लिंगासी; पहा हो !
अंगसंगी मनाच्या मध्यात स्थित
प्राणलिंगाचे रहस्य अनुभवलेला,
गुहेश्वरा, तुमचा शरण. / 608 [1]
वेद म्हणजे पढतगोष्टी,
शास्त्र म्हणजे बाजारच्या वार्ता,
पुराण म्हणजे पुंडांच्या कथा,
तर्क म्हणजे ठगरांची टक्कर,
भक्तीचा दिखावा म्हणजे
पदार्थ दाखवून उदरभरण,
ह्या सर्वांच्या पलीकडचे श्रेष्ठतम
परात्पर म्हणजे गुहेश्वर ! /609 [1]
वेद भेदू न शकल्याने नाशून गेले,
शास्त्र साधू न शकल्याने नाशून गेले,
पुराण पूर्ती न करू शकल्याने नाशून गेले.
ज्येष्ठ पंडित निजरूप न जाणता नाशून गेले.
आपल्या अहंबुद्धीने आपलाच घास घेतला;
मग तुम्हांस कोठून जाणती, गुहेश्वरा ? /610 [1]
आमच्या वचनाच्या एका पारायणाला,
व्यासाचे एक पुराण समबळ नव्हे.
आमच्या वचनाच्या एकशे आठ वाचनाला
शतरुद्रीय होम समबळ नव्हे.
आमच्या वचनाच्या सहस्त्र पारायणाला
लक्ष गायत्रीजप समबळ नव्हे,
कपिलसिद्ध मल्लिकार्जुना. /969 [1]
वेद, शास्त्र, आगम, पुराण,
सत्त्व नाही त्यात खासा;
जैसे कांडिल्यावरी धान,
पहा उरतो मागे कणी, भुसा.
कशासाठी ते कांडावे अन्
कशासाठी ते पाखडावे ?
भटकणाच्या मनाचे अग्र
घेतले जर का जाणून,
केवळ शून्यचि शून्य
प्रभू चेन्नमल्लिकार्जुन ! /1225 [1]
वेदांच्या मागे लागू नको, लागू नको.
शास्त्रांच्या मागे जाऊ नको, जाऊ नको.
पुराणांच्या मागे धावू नको, धावू नको.
आगमांच्या मागे भटकू नको, भटकू नको.
सौराष्ट्र सोमेश्वराचा हात धरल्यावर,
शब्दजालात सापडून व्याकूळ होऊ नको, होऊ नको. /1511 [1]
वेद हे ब्राह्मणांचे उपदेश,
शास्त्रे म्हणजे बाजारातल्या गप्पा,
पुराणे म्हणजे पुंडांच्या चर्चा,
आगम म्हणजे खोटे बोलणे,
तर्क, व्याकरण म्हणजे कवित्व मिरवणे.
अशा लोकांच्या बोलण्यात लिंग अनुभूती नसते.
म्हणून, असे लोक अंतरंग ओळखलेल्या
अनुभावीपेक्षा श्रेष्ठ नाहीत,
असे कलिदेव म्हणाला. /1896 [1]
या वचनाच्या अनुभावामधील अर्थ
सर्व वेदागमशास्त्रपुराणांमध्ये असे पहा.
या वचनाच्या अनुभावामध्ये नसलेला अर्थ
सर्व वेदागमशास्त्रपुराणांमध्येही नसे पहा.
या वचनाच्या अनुभावाचा अर्थ
सर्व वेदागमशास्त्रपुराणांनाही अगम्य पहा.
या वचनाच्या अनुभावाचा अर्थ
सर्व वेदागमशास्त्रपुराणातीत पहा,
अप्रमाण कुडलसंगमदेवा. / 2441 [1]
शास्त्र घन म्हणावे तर, ते कर्माची उपासना करते
वे श्रेष्ठ म्हणावे तर, ते प्राणी हत्या शिकाविते.
शृति श्रेष्ठ म्हणावे तर, ती व्यर्थाहीन शोध घेते
तेथे तुम्ही कोटोही नाही म्हणून त्रिविध दासोहावीना
कोटोही शोधू नये कूडलसंगमदेवा
वेदावर तलवार चालवीन, शास्त्राला बेड्या टोकीन
तर्काच्या पाटीवर चाबूक मारीन, आगमाच्या नाक कापेन
महादानी कूडलसंगमदेवा,
मादार चन्नय्याच्या घरचा पुत्र मी देवा
वेद म्हणजे पठणाची वटवट
शास्त्र म्हणजे बाजार गोष्ठी,
पुराण म्हणजे पुडांच्या गप्पा,
तर्क म्हणजे टगराची टक्कर,
भक्ति म्हणजे प्रदर्शनाने मिळविलेले यश नव्ये
गुहेश्वर म्हणजे सर्व ओलांडलेली श्रेष्टता
[1] Vachanas selected from the book "VACHANA" (Edited in Kannada Dr. M. M. Kalaburgi), Marathi Version Translation by: Shri Shankar M. Patil, Smt. Savita S. Naadkatti. ISBN: 978-93-81457-10-8, 2012, Pub: Basava Samithi, Basava Bhavana Benguluru 560001.