लिंगायतमध्ये देव स्वरूप
रेशमी किडा आपल्या धाग्यानेच कोश बांधी,
परि कोशास्तव धागा कोठून आणी ?
चरखा नसे, पेळू मुळी नसे, विणले कसे ?
आपुल्या देहातुनी धागा काढुनी पसरे,
त्यामध्ये प्रेमाने खेळ करी,
परि टोकास धागा राखून ठेवल्यागत,
आपल्याकडून निर्मिलेले जग आपल्यातच
समाविष्ट करू शके, आमचा कुडलसंगमदेव. /160 [1]
जनक-जननी नसलेला तू चिरंजीव,
तुझा तूच जन्माला येऊन वाढलास ना रे !
तुझी संतृप्तीच तुला प्राणतृप्ती होत आहे ना रे !
भेदू पाहणा-यांना अभेद्य होऊन,
तुझा तूच स्वयंप्रकाशित आहेस ना रे !
तुझे चरित्र तुजसाठी सहज रे, गुहेश्वरा. /536 [1]
वृक्षाच्या अंतरीची पाने-फुले
यथाकाळी प्रकट झाल्यापरी,
शिवांतर्गत प्रकृतिस्वभावादी
शिवभावाच्या इच्छेनुसार प्रकट होती.
लीलारत असता उमापती,
लीलारहित असता स्वयंभू गुहेश्वरा / 587 [1]
मेघांआडच्या दामिनीपरी,
अवकाशात दडल्या मृगजळापरी,
शब्दाआडच्या नि:शब्दापरी,
नेत्रांआडच्या प्रकाशापरी,
गुहेश्वरा, तव निज स्थिती. / 596 [1]
आपणचि आपुल्या विनोदार्थ
रचिले सकल जगत.
आपणचि आपुल्या विनोदार्थ
वेढिला त्यास सकल प्रपंच.
आपणच आपुल्या विनोदार्थ
फिरविले अनंत भवदुःखात.
ऐसा मम चेन्नमल्लिकार्जुन नामे परशिव
पुरे वाटता जगविलास,
आपणचि तोडी मायापाश. /1191 [1]
भूमीत दडल्या निधानापरी,
तैसेचि फळातील रुचीपरी,
अन् शिळेतील सुवर्णापरी,
तिळात लपल्या तैलापरी,
आणिक वृक्षातील अग्नीपरी,
ब्रह्म होऊन भावात लपलेल्या
चेन्नमल्लिकार्जुनाचे निजरूप
कोणासी जाणता न ये सहजी /1199 [1]
अमर, अविनाशी अन् रूपरहित
सजणावर मी भाळले गे आयांनो.
चिन्हविहीन, ना समीप, ना दूर अशा अभिन्न
सजणावर मी भाळले गे आयांनो.
भवरहित, भयरहित ऐशा निर्भय
सजणावर मी भाळले गे आयांनो.
सीमातीत निस्सीमावरी भाळले मी.
चेन्नमल्लिकार्जुन नामे पतीवरी
मी अति अति भाळले गे आयांनो ! /1230 [1]
जंगलात शोधावे तर तो देव, मोडलेले काटेरी झुडूप नव्हे.
पाण्यात शोधावे तर तो मासा-बेडूक नव्हे.
तप करावे तर वेषांतराला भुलणारा नव्हे.
देहदंडन करून मागावे तर तो ऋणदाता नव्हे.
अष्टतनूत दडलेल्या लिंगास स्पर्शन शोधून पाहिले
म्हणे अंबिग चौडय्या. /1381 [1]
गळ्यात असुरमाळा नाही, त्रिशूळ-डमरू नाही,
ब्रह्मकपाल नाही, भस्मलेपन नाही,
वृषभवाहन नाही, ऋषिमुनींच्या सहवासात असणारा नाही.
संसारसागरात फेकलेल्या संसारलक्षणविहिनांना
दुसरे कुठलेच नावही नाही म्हणे अंबिगर चौड्य्या /1387 [1]
दगडी देव, देव नव्हेत,
मातीचे देव, देव नव्हेत,
लाकडी देव, देव नव्हेत,
पंचधातूपासून घडविलेले देव, देव नव्हेत,
सेतुरामेश्वर, गोकर्ण, काशी, केदार
इत्यादी अडुसष्ट कोटी पुण्यक्षेत्रांमधील
देव, देव नव्हेत.
स्वतःस समजून, आपण कोण जाणिल्यास,
आपणच देव पहा,
अप्रमाण कूडलसंगमदेवा. /2444 [1]
*
[1] Vachanas selected from the book "VACHANA" (Edited in Kannada Dr. M. M. Kalaburgi), Marathi Version Translation by: Shri Shankar M. Patil, Smt. Savita S. Naadkatti. ISBN: 978-93-81457-10-8, 2012, Pub: Basava Samithi, Basava Bhavana Benguluru 560001.