Previous शरणाने *शरण* म्हणून नमस्कार करणेच भक्तीचे लक्षण जगाचे दोष तुम्ही कशाला निवारण करू पाहता Next

कोणी कोप करून आम्हांस काय करणार ? आम्हांस आमचे कुडलसंग असताना

सूचीत परत (index)

कोणी कोप करून आम्हांस काय करणार ? आम्हांस आमचे कुडलसंग असताना

कोणी कोप करून आम्हांस काय करणार ?
सारे गाव रुष्ट होऊन
आमचे काय वाकडे होणार ?
आमच्या मुलास मुलगी नका देऊ
आमच्या कुत्र्यास ताटात खाऊ नका घालू.
हत्तीवरून जाणान्यास कुत्रा चावू शकेल का,
आम्हांस आमचे कुडलसंग असताना ?/51 [1]

जंबूद्वीप नवखंड पृथ्वीवरी ऐका हो दोघा वीरांची प्रतिज्ञा :
हत्या करण्याची जिद्द देवाची, जिंकण्याचा निर्धार भक्ताचा.
सत्याची धारदार तलवार हाती घेऊन
सद्भक्त विजयी झाले पहा, कुडलसंगमदेवा./200 [1]

पगारी सैनिक नसे मी,
बलिदान देणारा सेवक असे हो मी.
हरून पळून जाणारा चाकर नसे हो मी.
ऐका, कुडलसंगमदेवा,
मज मरणच महानवमी हो !/206 [1]

उद्या यायचे ते आजच येऊ दे,
आज यायचे ते आत्ताच येऊ दे,
याला कोण भितो, याला कोण घाबरतो ?
‘जातस्य मरणं धुवं' म्हटले गेल्याने,
आमच्या कुडलसंगमदेवाने लिहिलेले लिखित
हरिब्रह्मादिकांनाही चुकविणे शक्य नाही./249 [1]

न्यायनिष्ठुर मी, नाही मिंध्यात कोणाच्या,
शरण पहा लोकविरोधी, त्यास भीती नसे हो कोणाची,
कुडलसंगमदेवाच्या राजतेजात सुरक्षित असल्याने./266 [1]

भक्तिहीनांचा दासोह सद्भक्तांसी ना रुचतो,
काऊसी आवडे निंबोणीचे फळ,
कोकिळेस नच त्याची थोडीही आवड.
लिंग सोडुनिया जे बोलती इतर,
संगय्याच्या शरणांना त्यांची ना आवड./303 [1]

संसाररूपी अरण्यात वाघ आहे, अस्वल आहे.
शरण त्यांना घाबरत नाहीत, महाधीर शरण घाबरत नाहीत,
कुडलसंगमदेवाचे शरण निर्भय आहेत./373[1]

उत्तम घोड्यास चाबूक उगारतो का कोणी ?
नगराधिपती बनल्यानंतर जातिगोत्र शोधावे का ?
परमसुज्ञानीस प्राणाची आस असते का ?
लिंगासी अंगीकारलेल्या शरणाची,
पाहतील त्यांनी कुचेष्टा केल्यास संदेह कशासाठी बरे ?
इहलोकीच्यांनी निंदा केली म्हणून,
मनी विपरीत भाव कशासाठी बरे ?
अमुगेश्वरलिंगासी जाणलेल्या शरणासी
कोणी वंदिले, वा कोणी निंदिले तरी काय ?/1266 [1]

*

Reference:

[1] Vachanas selected from the book "VACHANA" (Edited in Kannada Dr. M. M. Kalaburgi), Marathi Version Translation by: Shri Shankar M. Patil, Smt. Savita S. Naadkatti. ISBN: 978-93-81457-10-8, 2012, Pub: Basava Samithi, Basava Bhavana Benguluru 560001.

सूचीत परत (index)
Previous शरणाने *शरण* म्हणून नमस्कार करणेच भक्तीचे लक्षण जगाचे दोष तुम्ही कशाला निवारण करू पाहता Next