Previous लिंगायतमध्ये देवलोक, मर्त्यलोक इष्टलिंग स्वरूप Next

लिंगायतमध्ये एकच देव, देव एक, नावे अनेक (Lingayathism follows Monotheism)

सूचीत परत (index)
*

लिंगायतमध्ये एकच देव, देव एक, नावे अनेक

As per Lingayat Philosophy there is Only one GOD to whom Sharana's called with different names.

इष्टलिंग धारण करता देहावरी
स्थावरलिंगास पुजू नये.
स्वपतीस सोडून परपुरुषाची संगत होईल का उचित ?
करस्थळी असता देव,
स्थावरलिंगासी केल्यास वंदन
नरकात ढकलेल कुडलसंगमदेव./4 [1]

लाखेचा वितळणारा देव कसा योग्य म्हणू ?
आगीचा स्पर्श होताच सुरकुतणारा देव कसा योग्य म्हणू ?
प्रसंग पडल्यास विकला जाणारा देव कसा योग्य म्हणू ?
हल्ल्याच्या भीतीने पुरला जाणारा देव कसा योग्य म्हणू ?
सहजभावाचा, आत्मैक्य कूडलसंगमदेव एकच देव ! /17 [1]

सदा लोकांच्या दारी
राखण करती काही देव
'जा' म्हटले तरी न जाती,
कुत्र्यांहूनही क्षुद्र काही देव
लोकांकडे मागून पोट भरणारे देव,
आपण काय देणार, कुडलसंगमदेवा ? /33[1]

दोघे-तिघे देव म्हणून छाती फुगवून बोलू नको,
तो एकच असे हो, दोघे म्हणणे खोटे असे पहा हो !
कुडलसंगमदेवाशिवाय दूजा देव नसे म्हणती वेद. /61 [1]

दगडाची नागमूर्ती पाहून दूध वाहा म्हणती,
जिवंत नाग दिसताच मारून टाका म्हणती.
भुकेला जंगम आल्यास पुढे जा म्हणती,
न जेवणाच्या लिंगास नैवेद्य दाखवा म्हणती.
आमच्या कुडलसंगाच्या
शरणांना पाहून उपेक्षा केल्यास,
ढेकळावर दगड पडल्यागत होई त्यांची स्थिती. /148[1]

जागृती-स्वप्न-सुषुप्तीमध्ये दुसरे काही स्मरल्यास,
करा शिरच्छेद, शिरच्छेद !
खोटा ठरल्यास करा शिरच्छेद, शिरच्छेद !
कुडलसंगमदेवा, तुम्हांविना अन्य काही स्मरल्यास,
करा शिरच्छेद, शिरच्छेद ! /204 [1]

देव एक, नावे अनेक, परमपतिव्रतेस पती एकच हो.
अन्य देवास नतमस्तक झाल्यास, नाक-कान कापेल.
अनेक देवांचे उष्टे खाणान्यांना काय म्हणावे,
कुडलसंगमदेवा /230 [1]

निष्ठावंत पत्नीला पती एकच असतो पहा,
निष्ठावंत भक्ताला देव एकच असतो पहा.
नको नको, अन्य देवांचा कुसंग !
नको नको, परदैवताचा संग !
नको नको, अन्य देव म्हणजे व्यभिचार पहा,
कूडलसंगमदेवाने पाहिले तर नाक कापून टाकेल पहा. /241 [1]

नदी पाहिली की डुबकी मारतात,
झाड पाहिले की प्रदक्षिणा घालतात.
आटणारे पाणी आणि वठणाच्या झाडावर
विश्वास ठेवणारे तुम्हांस कसे जाणणार,
कुडलसंगमदेवा. /257 [1]

भक्तांना पाहून मुंडण करिती,
श्रमणा पाहून दिगंबर होती,
विप्रास पाहून हरिनाम घेती,
ज्या त्या पाहुनिया जो तो रंग घेती.
असे वेश्यापुत्र ना दाखवा मजसी,
मी काय म्हणू त्या अज्ञानी भक्तांसी।
पूजिती कुडलसंगासी अन् नमन इतर देवांसी. /296 [1]

मडके देव, सूपही देव, रस्त्याचा दगड,
तोही देव पहा !
फणी देव, धनुष्याची दोरी देव,
माप देव आणि लोटाही देव पहा !
असे देव झाले फार या भूवर,
पाय ठेवण्यासी नाही जागा पहा,
तथापि देव एकच आहे, कुडलसंगमदेव. /309 [1]

विष्णूची पूजा केली, त्यांचे दंड पोळलेले पाहिले,
जिनाची पूजा केली, त्यांना नग्न हिंडताना पाहिले,
मैलाराला पुजले, त्यांना कुत्र्याप्रमाणे भुकताना पाहिले.
देवा, आमच्या कुडलसंगय्याची पूजा केली,
त्यांना भक्त म्हणवून घेताना पाहिले. /357 [1]

शास्त्राला महान म्हणावे ? कर्माची पूजा करते.
वेदास महान म्हणावे ? प्राणिवध सांगते.
श्रुतीस महान म्हणावे ? समोर ठेवून शोधते.
तिथे कुठेही तुम्ही नसल्या कारणाने,
त्रिविध दासोहाविना अन्यत्र कोठेही पाहू नये
कुडलसंगमदेवास./364 [1]

शिवजन्मात जन्मून लिंगात समरस होऊन,
स्वत: लिंग धारण केलेले असताना
इतरांचे गुण गायीले, इतरांची स्तुती केली,
दुस-या विचारावर श्रद्धा ठेवली, तर
कर्म सुटणार नाही, भवबंध तुटणार नाही !
श्वानयोनीत जन्म अटळ आहे !
म्हणून कुडलसंगमदेवा,
तुमच्यावर विश्वास असल्याचे ढोंग करून
अविश्वास दाखविणारे दांभिक,
वाळूची भिंत बांधून पाण्याने धुतल्याप्रमाणे होत. /366 [1]

अमृतसागरी असता गायीची चिंता कशाला ?
मेरुमध्यात असता सुवर्णकणयुक्त माती
धुण्याची चिंता हवी कशाला ?
गुरुसान्निध्यात असता तत्त्वविद्येची चिंता कशाला ?
प्रसादाचरणात निष्ठ असता मुक्तीची चिंता कशाला ?
करस्थली लिंग विराजित असताना,
अन्य कशाची चिंता कशाला सांगा, गुहेश्वरा ? /451 [1]

अंगावर लिंगसंबंध होता तीर्थक्षेत्राला का हो जावे !
अंगावरील लिंगास स्थावर लिंग स्पर्शिता,
कोणते महान आणि कोणते सान म्हणावे !
शब्दातीत परात्परास न जाणल्याने वाया गेले.
जंगमदर्शन हे नतमस्तक होता पावन,
लिंगदर्शन हे करस्पर्शाने पावन.
समीपचे लिंग हीन लेखून,
दूरच्या लिंगास नमन करणा-या
व्रतहीनांना दाखवू नका हो, कूडल चेन्नसंगय्या./653 [1]

अंगावर लिंगधारण झाल्यानंतर
पुन्हा भवींशी आपले आप्त म्हणून मिसळता,
डोंगरातील मरीआईला जाणे नाही चुकत.
मातीचे ओले मडके अग्नीत भाजता,
ते आपल्या पूर्वकुळात मिसळेल का ?
अग्निदग्धघट: प्राहुर्न भूयो मृत्तिकायते
तच्छिवाचारसंगेन न पुनर्मानुषो भवेत्
या कारणे, पूर्व नि:शेष झालेले भक्त अपूर्व,
कूडल चेन्नसंगमदेव. /654 [1]

श्रेष्ठ पदार्थ शोधावे म्हणून
शरण मर्त्यलोकात येऊन,
आपल्या पचवास इद्रियाना भवत करून,
हळूहळू त्यांचा पूर्वाश्रय मिटवून,
संदेहाविना अर्पित केले असताना,
सगळ्या इंद्रियांना आपापल्या द्वारे ग्रहण न करता,
कूडल चेन्नसंगाला हवे म्हणून पकडून ठेविले आहे! /924 [1]

धारण केलेल्या लिंगाला कनिष्ठ करुनी,
पर्वतावरील लिंग श्रेष्ठ करण्याची रीत पहा !
नि:सत्त्व ढोंगी दिसता, नवीन पादरक्षा घेऊन
फटा-फटा मारावे असे म्हणे अंबिगर चौडय्या. /1393 [1]

शिलामूर्तीची पूजा करून,
कलियुगाचे गाढव होऊन जन्मले.
मृत्तिका देवाची पूजा करून, मानहीन झाले.
वृक्षास देव मानुनी, पूजा करुनी मातीत मिसळले.
बहुदेवोपासना करुनी स्वर्ग मिळाला नाही.
चराचरात व्यापलेल्या परशिवामध्ये किंकर झालेला
शिवभक्त श्रेष्ठ असे म्हणे आमचा अंबिगर चौडय्या. /1395 [1]

डोंगरावरील लिंगाला महान मानून पुजणाच्या मूर्वांनो,
काढून द्या तुमच्या गळ्यातील इष्टलिंग.
आमच्या हाती दिला नाहीत तर,
जलप्रवाहाच्या मध्ये नेऊन बांधून,
बुडवून तुम्हांला लिंगैक्य करतो
म्हणे आमचा अंबिग चौडय्या. /1407 [1]

गुळाला असे चौकाकार, पण गोडीला असे का चौकाकार ?
प्रतिकाची पूजा करता येईल, पण
ज्ञानाची पूजा करता येईल का ?
ज्ञान परिपूर्ण होता, हातातले प्रतीक त्यामध्येच लीन होईल
म्हणे अंबिग चौडय्या.. /1408 [1]

करस्थळीचे लिंग सोडून
पृथ्वीवरील मूर्तीची पूजा करणारा
नरकवासी, पातकी आहे असे म्हणेन,
परमपंचाक्षरमूर्ती शांतमल्लिकार्जुन /1901 [1]

दगडात, मातीत अन् झाडात देव आहे असे समजून
मन मानेल तसे भटकणाच्या भावांनो ऐका,
ते फक्त मोठेपणाचे लक्षण.
पण, तो शब्दापलीकडे असतो हे ओळखा.
मनाचे ठिकाण जेथे, तेथे तो असतो,
नि:कळंक मल्लिकार्जुना. /1981 [1]

जगाएवढा अन् आकाशाएवढा रुंद,
चरण पाताळाच्याही पलीकडे,
मुकुट ब्रह्मांडाच्याही पलीकडे,
विश्व आणि ब्रह्मांड हे आपल्या
कुशीत सामावून घेतलेला देव हा माझा देव.
त्या देवाच्या ठिकाणी मी सामावलो.
माझ्या ठिकाणी तो देव सामावला.
अशा देवावर विसंबून मी अहंकार जाळला, शून्याकार झालो.
या देवाला न ओळखताच,
स्वर्ग, मृत्युलोक आणि पाताळातील सारे
हा दगडाचा देव, मातीचा देव,
हा लाकडाचा देव, अशी त्याची पूजा करून बिघडले.
माझ्या देवाला ओळखून पूजा केली नाही, भक्ती केली नाही.
त्यामुळे, तो कुठल्याही जगाचा असू दे,
माझ्या देवाला ओळखले तर, भव नाही, बंधन नाही.
पूर्णपणे विश्वास ठेवलात तर,
आमचा बसवप्रिय कूडल चेन्नबसवण्णा. /2147 [1]

त्या काळातील हनुमंताने लंका ओलांडिली, म्हणून
ह्या काळातील वानराने बांध ओलांडल्यासारखे,
महाराणीने माडी चढली, म्हणून
दासीने उकीरड्यावर चढल्यासारखे,
कुमाराने अश्वारोहण केले, म्हणून
माकड कुत्र्याच्या पिल्लावर चढल्यासारखे,
मदोन्मत्त हत्ती सोमपथावर घुसले, म्हणून
शेळीने मदोन्मत्त होऊन, शिका-याच्या डे-यात घुसून
मान मोडून घेतल्यासारखे,
गावातील पतीला सोडून,
परगावातील जाराची स्तुती करणा-या तरुण स्त्रीसारखे,
दिसेल त्याची पूजा करणा-या निर्लज्ज विधवा,
अभद्रेचे तोंड पाहू नये,
अखंड परिपूर्ण घनलिंगगुरू चेन्नबसवेश्वर शिवसाक्षीने. /2257 [1]

पदरातील लिंगास सोडून, देवळातील लिंगापुढे थांबून
नुसत्या शब्दांनी बडबडणारे,
चोरीचे खाणारे, दारुडे, चांडाळांचे तोंड पाहू नये,
अखंड परिपूर्ण घनलिंगगुरू चेन्नबसवेश्वर शिवसाक्षीने. /2258 [1]

अंगावर लिंग धारण करून,
शिवभक्त म्हणून सांगून, शिवाचार मार्ग सोडून,
भवी शैवदेवांना साष्टांग नमस्कार करताना
लिंगावर आडवे पडून,
शरणु म्हणणा-या अशा चांडाळांचा शिवभक्त जन्म संपून,
यावच्चंद्रदिवाकरौ अठ्ठावीस कोटी नरक चुकत नाहीत.
ते नरक संपल्यानंतर श्वान, डुकराचा जन्म चुकत नाही.
तोही जन्म संपल्यानंतर रुद्रप्रलय चुकत नाही,
असे म्हणतात पहा संगनबसवेश्वर. /2271 [1]

[1] Vachanas selected from the book "VACHANA" (Edited in Kannada Dr. M. M. Kalaburgi), Marathi Version Translation by: Shri Shankar M. Patil, Smt. Savita S. Naadkatti. ISBN: 978-93-81457-10-8, 2012, Pub: Basava Samithi, Basava Bhavana Benguluru 560001.

सूचीत परत (index)
*
Previous लिंगायतमध्ये देवलोक, मर्त्यलोक इष्टलिंग स्वरूप Next