Previous लिंगायतमध्ये स्थावर लिंग, अन्य दैवांची पूजा करू नये लिंगायतमध्ये प्रसादाचे महत्व Next

लिंगायतमध्ये मानव समानता / सामाजिक समानता

सूचीत परत (index)
*

लिंगायतमध्ये मानव समानता / सामाजिक समानता

वडील आमचे मादार चेन्नय्या,
आजोबा आमचे डोहर कक्कय्या,
चुलते आमचे चिक्कय्या पहा,
दादा आमचे किन्नरी बोम्मय्या.
मज का बरे तुम्ही जाणत नाही, कुडलसंगमदेवा ? /14 [1]

कुळ कोणतेही असले तरी काय ?
इष्टलिंगधारीच कुलीन.
कुळ शोधता का शरणांमध्ये, जातिसंकर झाल्यावर ?
शिवधर्मकुले जात: पुनर्जन्मविवर्जितः ।।
उमा माता, पिता रुद्र, ईश्वरं कुलमेव च ।।
म्हटल्यामुळे, शेषप्रसाद स्वीकारीन, सोयरीक करीन.
कुडलसंगमदेवा, तुमच्या शरणांवर पूर्ण विश्वास ठेवीन. /54 [1]

हा कोणाचा, हा कोणाचा, हा कोणाचा म्हणवू नका हो
हा आमचा, हा आमचा, हा आमचा म्हणवा हो.
कुडलसंगमदेवा,
तुमचा घरचा पुत्र म्हणवा हो. /64 [1]

जेवणाचे ताम्हण वेगळे कास्य नव्हे,
पाहण्याचा आरसा वेगळे कास्य नव्हे.
पात्र नि भाजन एकच,
चमकविल्याने आरसा म्हणवी.
हे जाणिल्यास शरण, विसरल्यास मानव.
न विसरता पुजा हो, कुडलसंगमदेवास. /65 [1]

हत्या करणाराच मातंग, अभक्ष्य भक्षण करणाराच महार,
कुळ कसले, त्यांचे कुळ कोणते ?
समस्त जीवात्म्यांचे कल्याण इच्छिणारे,
आमच्या कुडलसंगाचे शरणच कुलीन. /175 [1]

जात धरून सुतक शोधता, ज्योत
धरून अंधार शोधल्यागत हो !
हा खुळेपणा का रे मानवा ? जातींमध्ये श्रेष्ठ समजशी !
शंभर कोटी ब्राह्मण असून काय उपयोग ?
'भक्तच सर्वश्रेष्ठ' म्हणे शरणवचन.
आमच्या कुडलसंगाच्या शरणांचा पादपरीस कवटाळ,
विनाकारण नाशून जाऊ नको, मानवा. /205 [1]

दासीपुत्र असो, वा वेश्यापुत्र असो,
लिंगदीक्षा झाल्यावर साक्षात शिव मानून वंदून, पुजून
तयांचे पादोदक, प्रसाद स्वीकारणेच योग्य.
असे न करता, तिरस्कार करणा-यांस।
पंचमहापातक नरक पहा हो, कुडलसंगमदेवा. /224 [1]

देव, देवा मम विज्ञापना ऐका हो :
विप्रापासून अंत्यजापर्यंत ।
शिवभक्त झालेले सर्व जण समान म्हणे मी.
ब्राह्मणापासून चांडाळापर्यंत
भवी असलेले सर्व जण सारखेच म्हणे मी.
असा विश्वास असे मम मनी.
या प्रतिज्ञेमाजी तिळमात्रही संशय आल्यास,
दात दिसतील असे नाक कापा हो, कुडलसंगमदेवा. /229 [1]

इष्टलिंगधारी भक्त घरी आल्यास
कायक कोणता म्हणून मी विचारले, तर
तुमची शपथ ! तुमच्या पुरातनांची शपथ !
शिरच्छेद ! शिरच्छेद !
कुडलसंगमदेवा, भक्तांमध्ये कुल शोधल्यास,
तुमच्या अंत:पुरातील सतीची शपथ. /233 [1]

जमीन एकच : महारवाडा आणि शिवालयासाठी,
पाणी एकच : शौच आणि आचमनासाठी,
कुळ एकच : स्वत:ला जाणून घेतलेल्याचे,
फळ एकच : षड्दर्शन मुक्तीसाठी,
तुम्हांला जाणणा-यांची स्थितीही एकच,
कुडलसंगमदेवा. /263 [1]

झाले राज्यारोहण नि आता लक्षण शोधतील ?
लिंगदेवास पुजुनी कुळ शोधतील ?
भक्ताचा देह तो माझाच देह
म्हणती कुडलसंगमदेव. /267 [1]

श्रीयाळाला शेठ म्हणेन ?
माचय्याला परीट म्हणेन ?
कक्कय्याला डोहर म्हणेन ?
चेन्नय्याला मातंग म्हणेन ?
आणि स्वत:ला जर मी ब्राह्मण म्हणालो, तर
कुडलसंगमदेव हसेल. /388 [1]

विटाळाशिवाय पिंडाला आश्रय मिळत नाही.
शुक्र-शोणिताचा व्यवहार एकच.
आशा-आमिष, रोष-हर्ष, विषयवासनादी सर्व एकच.
काही वाचून, काही ऐकून काय फळ ?
कुलज आहोत याचे तरी प्रमाण काय ?
सप्तधातुसमं पिंडं समयोनिसमुद्भवं ।।
आत्मजीवसमायुक्तं वर्णानां कि प्रयोजनम् ।। म्हणून,
लोखंड तापवणारा लोहार, कपडे धुणारा धोबी झाला,
विणणारा विणकर झाला, वेदपठण करणारा ब्राह्मण झाला.
कानातून जन्मलेला कोणी आहे जगात ?
म्हणून कुडलसंगमदेवा, लिंगस्थल जाणतो तोच कुलीन. /428 [1]

महार-मातंग भक्त झाले तर, त्यांच्या घरच्या कुत्र्याचा
मी पंचमहावाद्यांनी सन्मान नाही का करणार ?
उदो उदो चांगभले म्हणत जयघोष करेन !
कुळश्रेष्ठ विप्र भक्त नसतील,
तर त्यांची मी तिरडी बांधतो !
आपल्या शरणांचा महिमा महान आहे.
हे कुडलसंगमदेवा, तुमच्यावर अविश्वास
दाखवणाराच महार होय. /429 [1]

लिंग असेल तेथे अस्पृश्यता असेल ?
जंगम असेल तेथे कुळ असेल ?
प्रसाद असेल तेथे उष्टे असेल ?
अपवित्र बोलणा-याचे शब्द हे सुतक, हेच पातक.
निष्कलंक, निजैक्य असलेले त्रिविध निर्णय,
हे कूडलसंगमदेवा, तुमच्या शरणांशिवाय अन्यांना नाही. /431 [1]

कर्मजात हटवून गुरुलिंग यांनी पुण्यजात केल्यावर,
शिवकुलाशिवाय अन्य दुसरे कुल आहे का शरणांना ?
शिवधर्मकुले जात: पूर्वजन्मविवर्जित :।
उमा माता पिता रुद्र ईश्वरं कुलमेव च।।
कूडल चेन्नसंगय्या,
तव शरणांना नाही अन्य भिन्न कुल, शिवकुलाशिवाय /738 [1]

ब्राह्मण भक्त झाला तरी काय ? सुतके-पातके सोडत नाही.
क्षत्रिय भक्त झाला तरी काय ? क्रोध सोडत नाही.
वैश्य भक्त झाला तरी काय ? कपटीपणा सोडत नाही.
शूद्र भक्त झाला तरी काय ?
‘स्वजाती' असे म्हणणे सोडत नाही.
अशा जातीच्या दांभिकांना प्रसन्न होईल का,
कूडल चेन्नसंगमदेव ? /848 [1]

वार सात आणि कुळ अठरा असे म्हणतात,
हे आम्ही, नव्हे असे म्हणतो.
रात्र एक वार, दिवस एक वार,
भवी एक कुळ, भक्त एक कुळ,
हे एवढेच आम्ही जाणतो पहा,
कूडल चेन्नसंगमदेवा. /900 [1]

शूद्र, शूद्र म्हणून दूर रहा म्हणती,
तो कसा शूद्र ?
स्वत:चे शूद्रत्व स्वत: न जाणता
समोरच्याचे शूद्रत्व शोधणा-या भ्रष्टांना काय म्हणावे,
महादानी कूडल चेन्नसंगमदेवा ! /941 [1]

कुलीन होऊन मी काय करू ?
कलापाशी देव नसे, मनापाशी देव वसे.
कुठल्याही कुलगोत्राचा असला तरी,
तुझ्या कृपेनेच कुलीन,
कपिलसिद्ध मल्लिकार्जुना. /995 [1]

कुळासाठी भांडणान्या बाबांनो, ऐकाः
डोहराचे कुळ, मादाराचे कुळ, दुर्वासाचे कुळ,
व्यासाचे कुळ, वाल्मिकीचे कुळ, कौंडिण्याचे कुळ कोणते ?
कुळ बघण्यात अर्थ नसे;
त्यांचे वर्तन पाहिल्यास, तसले तिन्ही लोकी नसती,
कपिलसिद्ध मल्लिकार्जुना. /996 [1]

गावातील अवकाश, गावाबाहेरील अवकाश,
भिन्न असल्याचे म्हणता येई का ?
गावातील ब्राह्मण अवकाश, नि
गावाबाहेरील अंत्यज अवकाश,
भिन्न भिन्न असल्याचे म्हणता येई का ?
जिकडे पहावे तिकडे एकचि अवकाश!
निर्मिल्याने भित्ती, आतील-बाहेरील
असा नामभेद असे केवळ.
कोठूनही हाक दिली तरी 'ओ' देतोच बिडाडी. /1322 [1]

कुळहट्ट सोडून तुम्हांला प्रसन्न करून घेतलेल्या
शरणापुढे श्रेष्ठ कुलीन म्हणून नतमस्तक होईन.
तुम्हांला प्रसन्न करून घेतलेल्या शरणापुढे
वंदन न करता, उन्मत्त होणा-यांचे शिर
सुळावरील शिर होईल पहा, रामनाथ. /1739 [1]

कुल, गोत्र आणि जाती यांची
शिवाशिव मानून बिघडले कोट्यनुकोटी.
जननाच्या सुतकाने बिघडले अनंतकोटी.
शब्दांच्या सुतकाने फसलेली -
माणसे, मुनिगण अनंत कोटी.
आत्मसुतकाचा अहंकार बाळगून,
हरिहर ब्रह्मादिकही बिघडले.
'यदृष्टं तन्नष्टं' हे न जाणता,
चौदा भुवने संचिताचे गाठोडे घेऊन
पुन:पुन्हा जन्म घेतात.
सुतकाचा प्रपंच न सोडणा-या पाखंडी लोकांना
परब्रह्माची प्राप्ती होणार कशी?
म्हणून, तो नाम रूप क्रियेत सापडणारा नव्हे रे.
अगम्य, अप्रमाण, अगोचर आहे.
बसवप्रिय विश्वकर्मटाच्या काळिकाविमल
राजेश्वरलिंगाशिवाय दुस-या कुणालाही नकारच देणार. /1846 [1]

वेदशास्त्रे जाणणारा, तो ब्राह्मण.
रणांगणावर पराक्रम गाजवणारा, तो क्षत्रिय.
सगळ्यांचा सांभाळ करून व्यापार करणारा, तो वैश्य.
कृषिकर्म करणारा शूद्र.
अशी जाती-गोत्रात अडकलेली उच्चनीचतेची भावना.
चांगले आणि वाईट या दोनच जाती आहेत.
अठरा पगड जातींचा गोंधळच नाही.
ब्रह्म जाणेल तो ब्राह्मण.
मेल्या-मारलेल्या जिवांच्या कामात गुंतलेला, तो चांभार,
या दोहोंतला फरक समजून विसरला नाही.
रापी घेऊन सैंदणाचा आणि कट्याराचा दास होऊ नकोस,
निजात्मारामाला ओळ /1931 [1]

शुक्र, शोणित, मेद-मांस, क्षुधा, तृषा
विषयांचे व्यसन हा एकच फरक.
करण्याचे व्यवसाय वेगवेगळे असले तरी
दिसणारे जग आणि आत्म्याची जाणीव, ही एकच.
कुल कोणतेही असले तरी जाणीव झाली तरच परतत्त्वभावी;
त्याचा विसर पडला तर मलमायासंबंधी.
या दोहोंना जाणून विसरू नकोस.
रापी घेऊन सैंदणाचा आणि कट्याराचा दास होऊ नकोस,
निजात्मारामाला ओळख. /1932 [1]

जमीन एकच महारवाडा व शिवालयास
पाणी एकच शौचा व अचमनास
कुल एकच खत:ला जाणलेल्याला
फळ एकच षड्‍दर्शन मुक्तीचे
स्थान एकच कूडलसंगमदेव तुला जाणिल्याचे

विटाळातून जन्म घेवून कुलगोत्र शोधतोस,
अरे मातंगीचा सूत तू,
मेलेल्यास ओढून नेणात्यास शूद्र म्हणासी?
बोकड आणुन हुम्ही जीवे मारणारे
शास्त्र म्हणून बोकडाचा बळी घेणारे
वेद तुम्हास समजले नाहीत
आमच्या कूडलसंगमदेवाचे शरण कर्म विरहित,
शरण सन्निहित, अनुपम चारित्र्याचे
त्यांना प्रतिस्पर्धी कोणी नाही.

पट्ट बांधल्यानंतर लक्षणे शोधणार का?
लिंगदेवास पूजून कुल शोधणार का?
कूडलसंगमदेव, भक्ताची कयाच मम काया म्हटल्याने

देवा देवा तू भक्ताची मागणी पुराविणारा
ब्राह्मणापासून अंत्यजा पर्यात
भक्त झालेले सर्व एकच म्हणेन;
पंडीता पासून स्वपचा पर्यात
भवि झालेले सर्व एकच म्हणेन;
हे असे म्हणून विश्वासणारे माझे मन,
हा म्हणण्यात तीळमात्र संदेह
असल्यास तू माजे नाक काप, कूडलसंगमदेव

व्यासमुनी कोळीणिचा मुलगा, मार्कंढेय मातंगिचा मुलगा!
मंडोदरी मंडूकाची मुलगी,
नको हो नको कुलगोत्र शोधणे,
कांही मिळविले नाही होणी कुलगोत्राने
साक्षात अगस्त्य मुनि बेरड,
दुर्वास ऋषि चंभार, कश्यप तो लोहार,
कौंडिण्य ऋषि न्हावी, त्यांची थोरवी
त्रिलोक जाणति
आमच्या कूडलसंगमदेवाचचे वचन असे सांगते की,
श्वपच झाला तरी जो शिवभक्त तोची कूलीन

गुरूच्या हस्त कृपेने पुनर्जन्म झालेल्या भक्तात
कोणती जन्मजात शोधाल?
ते सर्व प्राकृतांना विना अप्राकृतांना असते का सांगा?
आमच्या शरणांच्यात जात शोधणात्या
दृष्ट पापींचे दर्शन मला न घडो
कूडलचन्नसंगमदेवा

साधक अवस्थेत कुल शोधणे शक्य विना
सिद्ध अवस्थेत शोधता येईल?
बत्याच जातीची लाकडे जाळली असता अग्नि एकच
विना तेथे लाकडांची खुण सापडेल का?
शिवज्ञान सिद्ध शिवभक्तात पूर्वजात शोधणात्या
आर्धवट देड्यास काय म्हणावे कूडलचन्नसंगमदेवा.

जेवण्यात नेसण्यात कर्म नाश झाले म्हणणारे!
घेण्यात देण्यात कुल शोधणारे!
अशांना भक्त कसे म्हणावे?
अशांणा युक्त कसे म्हणावे?
कूडलसंगमदेव, एकाहो महारीण
शुद्ध पाण्याने नाहील्यापरी झाले

कोणतेही कुल असले म्हणून काय
लिंग असणाराच कुलवंत
कुल शोधणार का शरणात, जाति संकर झाल्यावरी?
वाढलेला प्रसाद स्विकारून, त्यांच्यात मुलगी देईन
कूडलसंगमदेवा विश्वास ठेवेन तुमच्या शरणांच्यात

लिंगधारी भक्त घरी आल्यास
कायक कोणता म्हणून विचारले तर
तुमची शपथ! तुमच्या प्रमथांची शपथ!
मृत्युदंड! मृत्युदंड!
कूडलसंगमदेवा, भक्तांच्यात शोधिल्यास
तुमच्या, अंग:पुराची शपथ

*

[1] Vachanas selected from the book "VACHANA" (Edited in Kannada Dr. M. M. Kalaburgi), Marathi Version Translation by: Shri Shankar M. Patil, Smt. Savita S. Naadkatti. ISBN: 978-93-81457-10-8, 2012, Pub: Basava Samithi, Basava Bhavana Benguluru 560001.

सूचीत परत (index)
Previous लिंगायतमध्ये स्थावर लिंग, अन्य दैवांची पूजा करू नये लिंगायतमध्ये प्रसादाचे महत्व Next