Previous लिंगायत नीतिशास्त्र गुरुत्व योग्यतेने; जातीने नाही Next

लिंगायत धर्मगुरु निष्ठा

*

✍ महा जगद्गुरु डा. माते महादेवि

धर्मगुरु निष्ठा :- आदिप्रमथ व धर्मगुरु बसवेशांठायी निष्ठा असावी. "बसवेशांना स्मरून केलेली भक्ती श्रेष्ठ, बसवेशांचे स्मरण न करता केलेली भक्ती व्यर्थ" असे सिध्दरामेश्वरांनी सांगितल्याप्रमाणे समाजाची केन्द्रशक्ती म्हणून श्रीगुरु बसवेशांना मानले पाहिजे. एक उत्तम बी पेरल्यास त्याला अंकूर फुटून रोप होते, त्याची संपूर्ण वाढ होऊन वृक्ष होईपर्यंत आपण जागरुक राहून त्याला वाढवावे लागते. नाहीतर मूळ वृक्षाच्या आजूबाजूला अनावश्यक झाडी-झुडपे वाढून आपल्याला हवे असलेल्या वृक्षाची वाढ खुटते, शक्तीहीन होते.

त्याचप्रमाणे लिंगायत धर्माच्या इतिहासात मूळ बसवतत्त्व व संप्रदायाच्या अवती भवती कित्येक स्थानिक पंथ, उपपंथ (Lococults) रुपी झुडपे वाढून खच्या परंपरांची वाढ खुटली आहे, शिथिल झाली आहे. आणि ख-या धर्मगुरुलाच विसरण्याचे काम करीत आहे. या धर्म व समाजाला गुरु बंसवण्णांचे स्थान फारच वैशिष्ट्यपूर्ण आहे. ते स्थान दुस-या कुणालाही देता येणार नाही.

बाराव्या शतकात हिंदु धार्मिक क्षेत्रात आलेल्या बसवेश्वरांनी लिंगायत धर्माचे एक भव्य भवन निर्माण केले. यामधील आवश्यक असलेली अकरा लक्षणे यात सामावलेली असून ती सुसज्जित व परिपूर्ण अशी आहेत. या भवनाची रचना करताना असंख्य शिवशरण बसवेशांच्या अवयवाप्रमाणे झटले. वेळोवेळी हे भवन थोडे शिथिल झाल्यावेळी परत दुरुस्ती व स्वच्छता करून, रंगरंगोटी करुन ज्या त्या वेळेनुसार चांगले दिसण्यासारखे काही शिवयोगी संतांनी प्रयत्न केले. श्री तोंटद सिध्दलिंगेश्वर षण्मुख शिवयोगी, एकशे एक विरक्त, मैलार बसवलिंग शरण यांनी या प्रकारची सुधारणा केली. या धर्माची मूळ योजना करुन, रुपरेषा आखून दिलेल्या धर्मशिल्पी, धर्म संस्थापक बसवेश्वरांनाच याचे सर्व श्रेय द्यावे लागेल.

काही विरक्त आपले मठ बसवेश्वरांपेक्षाही पूर्वीचे आहेत असे सांगतात पण असे सांगणारे, ‘माझ्या वडिलांपेक्षा मी पूर्वीचा' असे सांगणाच्या मूर्ख मुलांसारखे हास्यास्पद होत. लिंगायत मठ बसवण्णांच्या नंतर स्थापन झाले. काही यापूर्वीचे मठ असल्यास ते शैव मठ होत. लाकुलीश, पाशुपत, काळामुख, परंपरेला जोडलेले होते. त्या सर्वांनी बसवेश्वरांच्या तत्त्वप्रणालीने प्रभावित होऊन लिंगायत धर्माचा स्वीकार केला हे जाणले पाहिजे.

आज बहुसंख्य मठाधिपती वेगवेगळ्या समय' ची (पध्दत) कल्पना करून, परस्परभेद करून लिंगायत धर्मामधील भक्तात फूट पाडीत आहेत. तुम्ही आमच्या मठाचे भक्त आहात असा बोध देतात. ते भक्त ही आम्ही या मठाचे भक्त, त्या मठाचे भक्त म्हणून भिन्न भावनेने बोलतात. ही अशी कल्पना नाहीशी होऊन “आम्ही शिवसमयाचे (शिवसमयाचे प्रतिष्ठापनाचार्य बसवेश आहेत) बसवभक्त, शरणमार्गी आहोत" अशी ही भावना दृढ झाली पाहिजे.

लोकांना धर्मगुरुंकडे, परमात्म्याकडे नेण्याचे कर्तव्य मठाधिकारीचे आहे. तर आपल्याकडे वा आपल्या मठाकडे नेण्याचे नव्हे. आज आम्ही असे स्पष्ट सांगु शकतो की, लिंगायत समाजातील काहीं गण्य व्यक्ति नाहीश्या झाल्या तरी काही होणार नाही. पण तत्त्व सुदृढ असल्यास ते परत पल्लवित होईल. पण समाजातील बसव तत्त्वांचा नाश झाल्यास त्या समाजाला पुढे भविष्य नाही. आपल्यासारखे कित्येक जन्म घेतील, जातील पण महात्मा गुरु बसवेशांसारखे जन्म घेणारे, धर्म संघटना करणारे इतिहासात एकदाच अवतरतात.

आपल्या देशात कित्येक वर्षापूर्वी बौध्द समाज नव्हता, बुध्दाचे तत्त्व होते. पण तत्त्वे सुदृढ असल्यामुळे कित्येक शतकांनंतरही बौध्द धर्म आपले डोके वर काढीत आहे. एक समाज आज अस्तीत्वात असला तरी त्यांत तत्त्वांचे बळ नसल्यास काही काळानंतर तो क्षीण होऊ लागतो हे जाणण्याचा काळ आज आला आहे.

लिंगायत धर्मातील प्रत्येक अनुयायांनी 'मी या मठाचा, मी त्या मठाचा' म्हणण्याचे सोडून "मी बसवभक्त, बसवसेवक म्हणण्यात" धन्यता मानावी. कारण आपल्याला धर्मानुसार जगण्यास ज्यांनी शिकविले ते म.बसवेश्वरच होय. या महान आत्म्याचा अवतार झाला नसता तर आम्ही सर्व शूद्र म्हणूनच राहिलो असतो. या विशाल लिंगायत धर्माच्या इतिहासात येऊन गेलेले, येत असलेले सर्वच केवळ साधनच होत. आपण स्वत: मिरविणारे नसून यांत बसव तत्त्वांचा रथ ओढण्यासाठी हात लावायला येणारेच आहेत.

"बसवराजांनी लिंगायत धर्म हा कल्याण राज्या" चे फळ देणारे बी पेरले. तो वृक्ष उत्तम प्रकारे वाढून सर्वांग परिपूर्ण असा समाज निर्माण झाले. सातशेसत्तर श्रेष्ठ शरणांनी साहित्याची देणगी सर्वांना दिली. नंतर आलेल्या महाशिवयोगींनी व शरणांनी या वृक्षाला पाणी, खत घालून पोषण केले. पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे अलीकडे काही दशकात कित्येक दुष्ट तत्त्व, संप्रदाय समाजात शिरून बसवतत्त्वाच्या वृक्षाच्या फांद्या तोडीत आहेत. म्हणून एक गोष्ट आपण लक्षात ठेवावे की बसवतत्त्वरूपी महावृक्षाचा जसा मोठा विस्तार होईल तसतसे आपल्याला तत्त्वाची दाट छाया आणि मोक्षाचे फळ मिळेल. हे न जाणता वृक्षाच्या सभोवती काट्यांचे झुडपे वाढू दिल्यास उद्या आपल्यालाच बसावयास छाया मिळणे अशक्य होईल. लिंगायत धर्मातील प्रत्येक अनुयायी, स्वामी, मठाधिकारी, साधक, सिध्द हे सर्व “श्री बसवेश्वर आमचे धर्मगुरू आहेत. त्यांच्या तत्त्व प्रचारासाठीच आमचे जीवन आहे.' अशी निष्ठा वाढावयास हवी, तेव्हा मात्र स्थानिक उपपंथ (Lococults) चे निर्माण न होता समाजात एक सूत्रीपणा राहील आत्मरहित शरीराला जशा मुंग्या, माशा लागून त्याला चावून खातात त्याप्रमाणे बसवनिष्ठा नाहीशी झालेल्या लिंगायत समाजास अंधविश्वास, जातीयता, कर्मठपणा आदि चावून खात आहेत.

म्हणून आज एक गुरुनिष्ठ अनुयायी वाढविणे अत्यंत आवश्यक आहे. गुरु बसवेश या धर्माचे आदिपुरुष आहेत. अथवा हा धर्म पूर्वीच होता? या संशयाला बळी न पडता समतावादी मंत्रपुरुष, असलेले बसवेश्वरच आदिगुरू, मोक्षदायक, शरणागत रक्षक म्हणून त्यांच्याविषयी श्रध्दा, निष्ठा दृढ होणे अत्यंत अगत्याचे आहे.

बसवेश्वर पूजा व्रत

पूर्वीच्या शरणांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या सर्व पूजेत गुरु बसवेशांचे स्मरण करावे. सत्यनारायण पूजा, नवग्रह पूजा, वरदाशंकर पूजा, शनी महात्म्य पठण, गौरी-गणपती व्रत, ललिता सहस्त्र नाम पठण इत्यादि लिंगवंत धर्मानुयायींना निषिध्द आहे. म्हणून गुरु बसवेशांची पूजा करणारी, श्री बसवेश्वर पूजा व्रताची अत्यंत पध्दतशीरपणे रचना केलेली आहे. ते पुस्तक मागवून आपल्या घरीच करता येते.

कोटि सुख आल्यास स्मरावे बसवेशांना
कोटि दु:ख आल्यास स्मरावे बसवेशांना


असे मडिवाळ माचिदेवांच्या आदेशाप्रमाणे सुख दु:खाच्या समारंभात श्री बसवेश्वरांची पूजा करावी. रुद्राभिषेक इत्यादि करु नये.

कोणत्याही धार्मिक सभा-समारंभाच्या सुरवातीला गणपती, सरस्वती स्तवन करण्यापेक्षा आदि प्रमथ, प्रथम गुरू बसवेशांचे स्तोत्रच गावे.

पूजा गृहात बसव भाव चित्र

बसव तत्त्वनुयायी असणाच्या लिंगायतांच्या पूजा गृहात अनेक भाव चित्रांचा बाजार मांडू नये. तिथे प्रशांत वातावरण असावे. पूजेला बसणा-यांच्या समोरच गुरु बसवेशांचे भावचित्र असावे. बसवगुरूंच्या सान्निध्यातच इष्टलिंग पूजा करावी. लिंगपूजा केल्यानंतर बसवगुरुंची एकशे आठ नामावली (या ग्रंथाच्या शेवटी दिलेली आहे.) म्हणावी.

इष्टलिंग धारणा नसलेल्या लहान मुलांना पूजा करण्यास वाव नसतो म्हणून पूजा - दर्शन - प्रार्थना करण्याचा नियम या धर्मात असल्यामुळे त्यांना गुरू बसवेशांची पूजा करावयास लावावी. स्नान करून, धुतलेले कपडे घालून आलेल्या मुलामुलींना विभूती लावून, बसवगुरुंची पूजा करून, १०८ नामावली म्हणवून, तीर्थप्रसादाचा स्वीकार करून नंतर जावे.

म्हणून अनुयायींनी आपापल्या घरी पूजा मंडप बांधून तेथे रोज बसवगुरूची पूजा करण्याची व्यवस्था करावी. कूडल संगम सूक्षेत्रात कृष्णा - मलप्रभा नद्यांचा संगम झाल्याठिकाणी श्री बसवेश्वर प्रेकच मंडप असल्याप्रमाणे त्याच्या सारखा मंडप बांधून त्यांत श्री गुरू बसवमूर्ती अगर भावचित्र ठेवावे.

बसवेश्वरांची भावचित्र पूजा

बसवेश्वरांची भावचित्र पूजा :- बसवेश हे लिंगायत धर्माचा आत्मा आहे. म्हणून लिंगायतांच्या घरी विशेष काही नसले तरी बसवण्णांचे वचन ग्रंथ आणि उठून दिसेल अशा ठिकाणी बसवेश्वरांचे भावचित्र असावे. व्यापा-यांनी आपल्या दुकानात, वैद्यांनी आपल्या वैयक्तिक दवाखान्यात बसवगुरूचे भावचित्र लावावे. घरात प्रवेश केल्याबरोबर सहज दिसेल असे समोरच्या भिंतीवर बसवेशांचे सुंदर भावचित्र असावे.

धर्जगुरुच्या साक्षीने प्रामाणिकपणे उद्योग-व्यवहार करण्याची प्रतिज्ञा करुन रोजच भावचित्र पाहिल्यावेळी त्यांचे स्मरण करीत सुप्रभाती पूजा करून, दर्शन घेऊन व्यापार उद्योग केल्यास त्या व्यक्तिच्या व्यवहारात सर्वप्रकारे अभिवृध्दी होते. यात किंचितही संशय नाही. तसेच लिंगायतांच्या घरी अक्क महादेवीचेही भावचित्र असावे. कारण अक्क महादेवी सारख्या शिव शरणी, वीर विरागिणी, महाशिवयोगिनी, कवियत्री, दार्शनिक असलेले धार्मिक इतिहासात मिळणे दुर्लभ होय. कन्नड देश व दार्शनिक असलेल्या भाषेला अभिमान वाटावा अशी देणगी देणा-या या उभयतांचे फोटो लावण्यात अभिमान वाटावा. घरात गेल्याबरोबर हे भावचित्र दिसावे ही प्रत्येक अनुयायांनी आपल्या धर्मगुरूला दिलेली छोटीशी दक्षिणा होय.

*

Reference: Lingayat Dharma Darpan - A Prose composition written by Her Holiness Maha Jagadguru Dr. Mate Mahadevi, translated by Sharni Sou. Shashikala Rajshekhar Madki
Pub: Vishwakalyan Mission, Basav Mantap, 2035, 20th Main, Rajajinagar, 2nd Block, BANGALORE - 560010.]

सूचीत परत (index)
Previous लिंगायत नीतिशास्त्र गुरुत्व योग्यतेने; जातीने नाही Next