Previous षटस्थल दर्शन लिंगायत नीतिशास्त्र Next

लिंगायत योग, लिंगांगयोग (शिवयोग)

*

✍ महा जगद्गुरु डा. माते महादेवि

मंत्रपुरूष झालेल्या बसवदेवांनी दिलेल्या व शिवशरणांनी साधलेल्या योगास शिवयोग असे नाव आहे. त्यास लिंगांग योग ही म्हणतात. इष्टलिंग डाव्या तळव्यावर ठेऊन, त्यावर त्राटक करून निर्विकल्प आणि चैतन्य समाधी मिळविण्याची साधना म्हणजे शिवयोग होय.

शिवभक्ती, शिवज्ञान, शिवध्यान, शिवक्रिया व शिर्वाचन असे पाच अंश त्यात सामावलेले आहेत. ज्ञान, भक्ती, क्रिया ही स्वतंत्रपणे ज्ञानयोग, भक्तीयोग, क्रियायोग होऊन भारतीय धर्म परंपरेत रुढ झालेले आहेत. पण शिवशरणांना ज्ञान नसलेली भक्ती ही मूढ भक्ती, भक्ती नसलेले ज्ञान हे, शुष्क ज्ञान. क्रिया नसलेली भक्ती आणि ज्ञान निरपयुक्त आहे हे जाणून, योग्याच्या जीवनाचा सर्वांग परिपूर्ण विकास व्हावयास हे सर्व अंश महत्त्वाचे आहेत म्हणून शिवयोगात त्यांचा समावेश करण्यात आला आहे.

अष्टांग योगात येणारे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार हे पूर्वार्धात अधिक प्रमाणात न करता आवश्यक तेवढेच करून उत्तरार्धात असलेले धारण, ध्यान, समाधी हे या योगसाधनेत आणून, शिवयोग सर्व सामान्य लोकांनाही आचरण्यास सुलभ साध्य होईल असे शरणांनी केले आहे. शिवयोगात त्यागांग, भोगांग, योगांग असे तीन सोपान आहेत. त्यागांगात विषयत्याग, भोगांगात प्रसादभोग आणि योगांगात लिंगयोग आहेत.

जोपर्यंत शरीरात विषयवासनेची हवा भरलेली आहे तोपर्यंत दैवी अनुग्रहाचे पाणी आत जाणार नाही. विषयवासनेचा त्याग केल्यावरच शिवप्रसाद भोगावा. जगातील सर्व सुख-दु:खे देवाला नैवेद्य म्हणून अर्पण केल्यावर, प्रसाद म्हणून स्विकारून 'परिणामी' व्हावे. त्यानंतर मन, चितादि अंत:करण चतुष्टय शिवमय होऊन, सदैव लिंगयोगामध्ये राहतो. शरण उठून बसल्यास, शिवरात्री शरण निद्रेत गेल्यास जपसाधना, तो चैतन्य समाधीत राहतो. अशा शरणाला त्यागांगात 'इष्टलिंग' सिध्दी लाभल्यास भोगांगात 'प्राणलिंग' सिध्दी, योगांगात 'भावलिंग' सिध्दीचा लाभ होतो. त्यागांगात काही मिनिटे स्थिर, स्वस्थ न बसणारे स्थूल शरीर एका नियंत्रणाखाली योऊन काही काळ तरी इष्टलिंग पूजेस बसण्याची तयारी दाखविते. भोगागात विविध दिशेकडे धावणारे, विविध रुचीसाठी फिरणारे मन लिंगरुचीकडे जाऊन देवाला हवी असलेली एकाग्रता साधते. तेव्हां सूक्ष्म शरीराचे शुध्दीकरण होते. शरीर व मनापेक्षाही सूक्ष्म असलेले भाव योगांगात परिशुध्द होऊन, सदैव लिंग ध्यानामध्ये तन्मय होऊन परमतृप्तीची प्राप्ती होते.

गुरुने दिलेले इष्टलिंग आपल्या डाव्या तळहातावर ठेऊन, अभिषेक, पूष्पार्चना, नैवेद्य अर्पण इत्यादी सवस्तूंनी पूजा करणे ही इष्टलिंग पूजा होय. हृदयाच्या पीठावर आत्मलिंग स्थापन करून सद्गुणरूपी सामुग्रीने, मनाच्या हस्ताने ध्यानरूपी अर्चना करणे ही प्राणलिंग पूजा. ब्रम्हांडागत असलेले परंज्योती स्वरूप असे महाचैतन्य ओतप्रत भरून उरल्यामुळे साधकाचे भावही त्या चैतन्याचे ग्रहण करून, विश्वात चाललेल्या महापूजेशी अनुसंधान केल्यास तीच भावलिंग पूजा. भावलिंग पूजा करण्याची शक्ती प्राप्त करणे हीच आत्यंतिक सिध्दी होय.

शिवयोगाचे अती मुख्य तत्त्व म्हणजे कैलास पदवीची अगर रुद्र-इंद्र-विष्णु पदवीची आश करणे नव्हे. या भूलोकात असतानाच सर्वांगी लिंगत्व लाभणे होय. सर्वांग परिशुध्द होऊन लिंगगूण सामावून घेणे होय.

महात्मा बसवेश्वर म्हणतात :

घरच्या नव्याच्या घरचि वार्ता काय सांगावी ?
अंगाची विद्या नको त्याला
डोळ्याने चांगले पाहिल्याशिवाय पाहणारा नव्हे
पाय, हात, सर्वांग शुध्द झाल्याकारणे
कूडलसंगम देव माझ्यात सामावला (ब.व.९११)

मरण पावल्यावर पुर्नजन्म न घेता अवकाशात एकरुप व्हावयास, येथील भूवरील जीवन सर्वांग शुध्द व्हावयास हवे. मनाने चैतन्य समाधीची स्थिती मिळविली पाहिजे. एका योग्याची निर्विकल्प समाधीत असताना मानसिक स्थिती जशी असते, तशी निर्विकार स्थिती सर्व अवस्थेत असावयास हवी. इंद्रियांच्या द्वारे जंगम व्यवहार करतानाही तीच निर्विकार मन:स्थिती असल्यास तीच चैतन्य साधी होय. शरणांच्या कडून त्या स्थितीत होणारे सर्व व्यवहार देव पूजाच होतात. म्हणूनच अक्क महादेवी आपल्या वचनातून म्हणते:

श्वासातील सुगंध असता फुलाची काय पर्वा ?
शमें, दमे, शांती सहनशीलता असता समाधीची अपेक्षा क्शास?
आपणच जगी सर्वमयी व्यापल्यावर एकांताची काय पर्वा ?
चन्नमल्लिकार्जुना (अ. व. ९८)

अंतरंद्रिय आणि बाह्य इंद्रिय निग्रह केल्यावर चित्तात समता, शांती व्यापल्यास याच जीवनात समाधी स्थितीचा अनुभव मिळतो असे अक्क महादेवीचे मत आहे. अशा स्थितीत सामावून जाणे हे शिवयोगाचे ध्येय आहे. मयं लोकात असतानाच शिवयोग्याचे मन सर्व प्रकारचे विकार, चंचलता, संकल्प-विकल्प इत्यादिच्या बंधनातून मुक्त होऊन, भाव’ ब्रम्हांडागत महालिंगात सामावून जाते. मृत्यूसमयी शरीरापासून आत्मा वेगळा झाल्यावर परिशुध् अंत:करणयुक्त शुध्दात्मा परमात्म्यात एकरुप होतो.

याविषयी चर्चयसवेशानी फारच मार्मिकपणे सांगितले आहे. वचन-

हे देवा, तुमच्याकडून कर्ज काढून तुमच्या शिवपुरास
देवलोकात येणारा नव्हे.
पृथ्वीचे कर्ज पृथ्वीला देऊन,
आपाचे कर्ज जलास देऊन
तेजाचे कर्ज अग्नीला देऊन
वायूचे कर्ज वायूला देऊन
आकाशाचे कर्ज काला देऊन
कुणालाही प्रसाद दिला नाही म्हणून
कुडल चन्न संगम देवाच्या गाडून घेतलेल्या
शरणास नमो नमो म्हणतो

परिशुध्द असलेला, कलंकरहित असलेला कापूर संपूर्णपणे अग्नीत वितळल्याप्रमाणे आत्मा हा परमात्म्यात लीन होतो. कोणतेही संस्कार, वासना नष्ट झाल्याकारणे भाजलेल्या बीयांप्रमाणे या साधकास पुर्नजन्म नाही. असे अवकाशाचे गुण अगर तत्त्वाचा लाभ झाल्यावर महा अवकाशात एकरुप अगर लीन होणे हेच शिवयोगाचे ध्येय आहे.

*

Reference: Lingayat Dharma Darpan - A Prose composition written by Her Holiness Maha Jagadguru Dr. Mate Mahadevi, translated by Sharni Sou. Shashikala Rajshekhar Madki
Pub: Vishwakalyan Mission, Basav Mantap, 2035, 20th Main, Rajajinagar, 2nd Block, BANGALORE - 560010.]

सूचीत परत (index)
Previous षटस्थल दर्शन लिंगायत नीतिशास्त्र Next