Previous पंचाचार लिंगांगयोग (शिवयोग) Next

षटस्थल दर्शन

✍ महा जगद्गुरु डा. माते महादेवि

*

पायास बांधिला धोंडा!
गळ्यात बांधिले भेंड
धोंडा तरू देईना! भेंड बुडू देईना!
संसार शरधीच्या पैलतिरी न्यावे आता,
कालांतक कुडलसंगमेशा मज तूचि दाता (बसवेश्वर वचन)

पायी पापाचा धोंडा बांधून, कंठी पुण्याईचा भेड बांधून भवसागरात बुडत, तरंगत राहणारा बद्ध जीव सर्व सुखदु:ख जिंकण्यासाठी, जन्ममरणाचा फेरा चुकविण्यासाठी, नित्यसुख अनुभवण्याची सिद्ध स्थिती प्राप्त होण्यासाठी शिवयोगाचे मार्गक्रमण करीत असताना त्याला सहा पाय-या चढाव्या लागतात, तेच षट्स्थल होय. पर्वत चढण्याचा मार्ग शिवयोग म्हटल्यास षट्स्थल हे मार्गावर येणारे विशिष्ट स्तर आहेत. भक्त, महेश, प्रसादी, प्राणलिंगी, शरण, ऐक्य या सहा स्थलात जी व्यक्ती सामावून जाते तो महाजंगम होऊन सर्वांग परिपूर्ण विकास साधतो.ज्यात किया, ज्ञान, भाव या तिन्ही शक्ती पूर्णपणे विकसित होतात त्याचे विवरण काही शब्दांत सांगते.

उपासक अंग (परिशुद्ध अंत:करणावृत आत्मा) उपास्य लिंग व्हावयाचा आरोहण मार्ग हाच षट्स्थल होय.उपासना अथवा भक्ती हेच मर्म असणा-या या दर्शनात अंग-लिंग(जीव-परत्मा)यांच्यात असणारी भिन्नता, द्वैत भाव लोप होईपर्यत भक्तीची स्तरास्तराने वृध्दी होत लिंगाग सामरस्यास साधन होते.हे दर्शन सहा स्तरावरून साधकाचा मनोविकास चित्रित करते म्हणून याला षटस्थल म्हणून ओळखतात.वचन:-

विश्वासपूर्वक भक्त होऊन,
त्या विश्वासाच्या निष्ठेने महेश्वर होऊन,
त्या स्वानुभवाच्या ज्ञानाने शरण होऊन,
त्या ज्ञानाने नित्यतत्वात समरस भाव
स्थीर झाल्यास तोच ऐक्य गुहेश्वरा --प्रभुदेव

सोडळ बाचरस म्हणतात,

भक्त झाल्यास,तन,मन,धनाची आशा करू नये.
महेश्वर झाल्यास परधन, परचिंता, परस्त्री याकडे मन जाऊ नये.
प्रसादी झाल्यास, सुखाचे ग्रहण न करणारे असे प्रसादमय शरीर व्हावे.
प्राणलिंगी झाल्यास, देहावरील ममत्व प्राणलिंगात सामावून जावे.
लिंगैक्य झाल्यास मी-तू पणाचा भाव नाहिसा होऊन,
आपल्यात आपण सुख-दु:ख भावनेचे अतीत व्हावे.
असे हे षट्स्थल कोणसही शक्य होणार नाही.

सोडळ देवाने षट्स्थलातील भक्तीची साकार मूर्ती बसवण्णास बनविले.

अज्ञानाच्या अंध:कारात झोपलेल्या, गाढनिद्रेत असणा-या व्यक्तीला अचानक पूर्व सुकृतामुळे, म्हणजे त्याच्या फलस्वरूप जाग येते.

तेव्हा मी कोण आहे? याविषयी जाग येऊन "पिंड स्थलाला" तो येतो.त्यानंतर माझा व परत्माचा संबंध काय?म्हणून विचार करीत "पिंड ज्ञान स्थलावर" उभा राहतो.

स्वरूपतः मी आत्मा आहे, देह नाही असे जाणल्यावर आपल्या लौकिक जीवन मूल्यांविषयी तिटकारा येउन तळमळ उत्पन्न होऊन "संसार हेय स्थलांस" येतो.गुरूची कृपा आपल्यावर व्हावी म्हणून गुरूरूपी सुर्याचा उदय होतो.तेव्हा गुरू त्याला विभूती,रूद्राक्ष, इष्टलिंग देवून पादोदक आणि प्रसादाने अनुग्रहीत करून मंत्रोपदेश देतात.त्यानंतर आध्यात्मिक जीवनास प्रारंभ होतो. भाव, देवाच्या ठायी शरणागती असे हे गूण ज्याच्यात स्थिर झाले आहेत तो भक्त होय.

श्रध्दा, भक्ती, ज्ञान हे अधिक गाढ होऊन, निष्ठा भक्ती होऊन, मूढपणाची कल्पना निवळून, विवेचन शक्ती जागृत होऊन, परधन, परस्त्रीविषयी मनात विचार न आणता सत्य, शुध्द कायक करणारा तो महेश्वर होय.

आपण सत्य, शुध्द राहून मिळविलेली प्रत्येक वस्तु आपण उपयोगात आणण्यापूर्वी देवास अर्पण करून, आपल्या जीवनात येणारे सुख दु:ख , निंदा-स्तुती आदि सर्वच त्याच्या चरणी वाहून, आपण अर्पण करण्यात अवधानी (Vigilant) होऊन तृप्तीमय जीवन जगणारा प्रसादी होय. त्याच्या दृष्टीस सर्व जग दैवी प्रसादच आहे असे वाटू लागते.

तेव्हा त्याच्यातील अनुभव भक्तीला अंकूर फुटून, तो वाढू लागून मन अंतर्मुख होऊ लागते. सत्य, शुध्द कायक करीत पवित्र जीवन जगत असल्यामुळे, त्याच्यातील सर्व अंत:करण पवित्र व शुध्द झाल्यामुळे आत्मज्योतीचा प्रकाश झळकू लागतो. या प्राणलिंग अथवा दिव्य ज्योतीच्या ध्यानात मग्न झाल्यामुळे त्याचे बाह्य प्रापंचिक व्यवहारावरील लक्ष कमी होते. तेव्हां त्याचा प्राणमय स्वभाव नाहीसा होऊन तो लिंगमय होतो. तो पूजा करीत असलेला प्राणलिंगच त्याचा प्राण बनतो. या आत्मतत्त्वाशी त्याचा भाव एकरुप होऊन, स्वरुप साक्षात्काराचा त्याला लाभ होतो. पिंडगत असलेल्या आत्म्याचा साक्षात्कार झालेले त्याचे मन, ब्रम्हांडगत भावलिंग अथवा महालिंग जाणण्यासाठी व्याकूळ होते. तेव्हा त्याच्यात आपण परमात्म्याचे सती आहोत, परमात्मा आपला पती आहे हा भाव प्रबळ झाल्याने तो देवाच्या चरणी संपूर्ण शरणागत होतो.

भक्ती स्थलात भक्त शरणागत झाल्यावेळी आपली वस्तु अर्पण करतो तर आता आपले सर्वस्व समर्पित करतो. देव-भक्तात पती-सती संबंध दृढ झाल्यावर दिव्य अशा आनंद भक्तीचा अनुभव त्यास होतो. तेव्हा त्याच्यातील विषय मुख, आणि पंचेद्रियांच्या तृप्तीची आसक्तीही नष्ट होते. आपल्या परमात्मापतीशी मधुरा भक्तीत तो स्वत:ला विसरतो. परसती, परस्त्री ही माता आहे असं समजणारे मन, आता आपली सती, स्त्री ही माता आहे अशा त-हेच्या स्तराला पोहोचतो. या स्थितीला पोहोंचलेली बसव सती निलांबिका म्हणते.

सती म्हणू नये मन बसवराजांची
पती म्हणू नये बसवेशास माझ्या
बसवेश माझा शिशु झाला.....

लिंगपती, शरणसती अक्क महादेवीने कित्येक वचने गाईली आहेत.

लिंगपती शरणसती मधील संबंध निकट होता होता शरणामधील भाव निर्भाव होऊन त्याला बयल' स्थिती प्राप्त होते. विशाल असलेल्या आकाशात एक पक्षी उडाल्यास त्याचा अवकाशावर काहीही परिणाम होणार नाही, अशा उन्नत स्थितीस तो पोहोंचलेला असतो. ब्रम्हांडागत असलेल्या परमात्म्याचे चैतन्य ओतप्रत होऊन, भरून उरलेला प्रकाशमय झाल्याचे ग्रहण करून महासाक्षात्काराचा लाभ त्याला होतो.

पूज्य-पूजक-पूजा अशी त्रिपुटी रहित होऊन, तेव्हा त्याच्यात समरस भाव उत्पन्न होऊन तो आत्मतृप्तीत रममाण होतो. हीच शेवटची स्थिती होय. ह्या आत्यंतिक अनुभवालाच लिंग-अंग सामरस्य म्हणतात. हीच सर्वांग लिंग स्थिती.

षटस्थलाच्या या मनोविकासाने बहिरंगिक आणि अंतरंगिक अशा सर्वांवरही परिणाम होतो. जग आणि जीवन याकडे पाहण्याची त्याची दृष्टी दैवीमय होऊन त्याचे सर्व व्यवहार देवीकृत झाल्याचे दिसून येते.

Reference: Lingayat Dharma Darpan - A Prose composition written by Her Holiness Maha Jagadguru Dr. Mate Mahadevi, translated by Sharni Sou. Shashikala Rajshekhar Madki
Pub: Vishwakalyan Mission, Basav Mantap, 2035, 20th Main, Rajajinagar, 2nd Block, BANGALORE - 560010.]

*
सूचीत परत (index)
Previous पंचाचार लिंगांगयोग (शिवयोग) Next
cheap jordans|wholesale air max|wholesale jordans|wholesale jewelry|wholesale jerseys