Previous सदाचार गणाचार Next

शिवाचार

*

अ) हे सामाजिक समता दर्शविणारे तत्त्व होय. जगातील सर्व मानव एकाच देवाची लेकरे आहेत. या मानवी जनांमध्ये जातीयतेची आडवी भिंत उभारू नये.

वर्णाश्रमामध्ये असे सांगितले जाते की, जन्मापासूनच ब्राम्हण, क्षत्रीय, वैश्य व शूद्र असे वर्गीकरण केलेले आहे. हे नियम देव निर्मित नसून मानव रचित आहेत है। जाणून शरणांनी असे सांगितले आहे की, जगात केवळ दोनच जाती आहेत. एक स्त्री, दुसरा पुरूष.दोनच कुळे आहेत,भवी आणि भक्त. या तत्वाच्या आधारे जात, वर्ण, वय, लिंगभेद रहित सर्व मानवांना गुरूकडून अनुग्रह घेवून मुक्ती, मोक्षाचा लाभ मिळविण्याचा समान हक्क आहे. व या तत्वाला मान्यता देणारे लिंगायत होत.

आ) नारी ही माया नव्हे.ती शुद्रही नव्हे. ती ही मोक्षाची कास धरणारी धर्ममार्गावरील प्रवासी आहे, पथिक आहे हे जाणून पुरूषाप्रमाणे स्त्रीलाही समानतेने लिंग संस्कार दिला जातो. तसेच पात्रता व अपेक्षा असलेल्या महिलेला गुरू होण्याचा हक्क आणि मठ व पीठ यावर अधिकार देण्यात येतो. या सर्व गोष्टींवर पूर्ण विश्वास ठेवणारा व स्वतंत्र विचार करू शकणारा तो लिंगायत.

इ) कोणत्याही जातीतील माणसाला लिंगदीक्षा देता येते. काही स्वामी, मठाधीश हे लिंगायत नसलेल्यांना दीक्षा देण्यास तयार नसतात. हा अत्यंत मूर्खपणाचा विचार आहे. सर्व जातीयांना दीक्षा देण्यासाठीच लिंगायत धर्म जन्मला. लिंगायतांना लिंगधारणा करीत नाहीत तर लिंग नसलेल्यांना लिंगधारणा करावयाची असते. रोगी असल्यास त्याला चिकित्सेची जरूरी असते. निरोग्याला कसली चिकित्सा ? नवरा नसलेल्या कन्येचे लग्न होते, नवरा असलेल्या सौभाग्यवतीस लग्नाचे काय कारण?

केवळ काही वर्णातील लोकांच्या स्वाधीन असलेल्या धर्माचा सर्वांना समानतेने लाभ मिळावा म्हणूनच लिंगायत धर्माची निर्मिती झाली. एक दीप उजळविण्यास पणती, वात व तेल लागते तद्वत कायारूपी पणतीत भक्तीचे तेल आणि सदाचाराची वात असल्यास धर्मसंस्काराचा दीप लावल्याबरोबर ज्योती उजळते. प्रज्वलित होते.

ई) लिंगदीक्षा घेतलेल्यांची पूर्वजात कोणतीही असली तरी दीक्षा घेतल्यानंतर ती नाहीशी होते.दीक्षेनंतर पुन्हा जात पाहू नये.पाहिल्यास तो धर्मद्रोह,पातक होय.

चन्नबसवेश आपल्या वचनात म्हणतात (२४५,च.ब.व.) “अग्नीत घातलेल्या वेगवेगळ्या जातीचे लाकूड जळून भस्म होते. तेव्हा त्या वेगवेगळ्या जातीच्या लाकडांचे वेगवेगळे भस्म करता येत नाही. तेथे भिन्नता उरत नाही. उरते शेवटी एकच भस्म, त्याचप्रमाणे गुरूदीक्षाग्नीत साधक दग्ध झाल्यावर त्याची पूर्वजात जळून उरते ते केवळ लिंगवंत तत्त्व”

धर्मसंस्काराने जात जळून समानता उरते, असे जाणल्यावर दीक्षा घेतलेल्यांना आपल्यात सामावून घ्यावे. कन्या देण्याघेण्याचा कुलाचार, त्यांच्याबरोबर जेवणाचा क्रियाचार हे दोन्हीही नि:संकोचपणे करावे.

काही लोक नवीन दीक्षा घेतलेल्यांच्या बरोबर सहभोजन करावयास तयार होतात,पण रक्तसंबंधास,विवाहास मात्र तयार होत नाहीत.हे चुकीचे आचरण आहे.त्यांच्याबरोबर पूर्णतया समरस व्हायला हवे.जातीचे बंधन तोडणे हेच लिंगायत धर्माचे कर्तव्य आहे. बसवण्णांचे वचन :

“कोणत्या जातीचा का असेना, शिवलिंग असे तो कुलज”
शिवधर्म कुले जातः पुनर्जन्म विवर्जितः
उमा माता पिता रुद्र ऐश्वर कुलमेवच ।।
बसवेशांचे दुसरे वचन असे आहे:
खाण्या-पिण्याने म्हणती झाला क्रियाहीन।
कन्या देण्या-घेण्यात हुडकती जात पात,
कसा म्हणू तयांना भक्त? कसा म्हणू तयांना युक्त?
ऐक बा कुडलसंगम देवा,
महारीण शुध्द पाण्याने स्नान केल्यापरी!
(ब.व.६७७)

Reference: Lingayat Dharma Darpan - A Prose composition written by Her Holiness Maha Jagadguru Dr. Mate Mahadevi, translated by Sharni Sou. Shashikala Rajshekhar Madki
Pub: Vishwakalyan Mission, Basav Mantap, 2035, 20th Main, Rajajinagar, 2nd Block, BANGALORE - 560010.]

सूचीत परत (index)
*
Previous सदाचार गणाचार Next