लिंगांगयोग (शिवयोग) | लिंगायत धर्मगुरु निष्ठा |
लिंगायत नीतिशास्त्र |
✍ महा जगद्गुरु डा. माते महादेवि
शरण धर्मात नीतिशास्त्राला अति उन्नत स्थान दिलेले आहे. नीतिशास्त्र हे आध्यात्मिक जीवनांत सामावून जावे असे शरणांचे मत आहे. भौतिक, नैतिक मूल्य हे आध्यात्मिक मूल्यांचे साधन व्हावे; इतकेच नव्हे तर, दोरखंडातील तीन दोर वळल्यावर अविनाभाव संबंध होतो, त्याप्रमाणे जुळून एकरूप व्हावे.
नैतिक शुद्धतेचे साधन म्हणजे शेत स्वच्छ केल्याप्रमाणे शेत स्वच्छ करून तसेच सोडल्यास. जगास त्याचा काय उपयोग? वाईटही होणार नाही अगर चांगलेही होणार नाही, पण शेत: स्वच्छ केल्याशिवाय बी पेरल्यास पिकाच्या अवजी गवत व विषारी वनस्पती वाढून शेतात पाय ठेवण्याची पंचाईत होते, तद्वत. परमात्म्यावर, धार्मिक मूल्यावर विश्वास न ठेवणाच्या नीतिमान माणसाची स्थिती म्हणजे शेत नांगरून पेरणी नसल्यासारखे होय. त्याच्याकडून चांगले अगर बाईट काहीही घडणार नाही. देवावर विश्वास ठेऊन हजारो रूपये देऊळ बांधण्यासाठी खर्च करूनही नैतिक शुद्धता नसलेली व्यक्ती म्हणजे अस्वच्छ जमिनीत पेरलेल्या बीयासारखे होईल म्हणून दिमाख दाखविणा-या अध्यात्मापेक्षा शुच्छ चारित्र्यास शरण फार मान देतात.
नास्तिक माणसाने देवावर विश्वास न ठेवता, दानधर्म न केल्यास त्यास वैयक्तिक पाप लागेल. मुक्तीचा आनंद मिळणार नाही. पण दुसरा आस्तिक असूनही नैतिक बल त्याच्याजवळ नसल्यास त्याच्यापासून समाजात अनिष्टच घडेल. म्हणून शरणांनी नीतिमान माणसाला मोठे स्थान दिलेले आहे. अतिशय सोवळे करणे आणि समाजात मोठेपणा दाखविण्यासाठी दान, धर्म करणे ही नीती नव्हे.
दुस-यांच्याकडून आपणाला जे काय होऊ नये म्हणून आपण आशा करतो तेच आपण इतराबरोबर न करणे हीच नीती. म्हणूनच महाकवी सर्वज्ञ म्हणतो "आपल्याप्रमाणे इतरांना मानले तर तोच कैलास" आपल्याला कोणीही फसवू नये. आपल्या पत्नीला कोणीही स्पर्श करू नये, आपली संपत्ती चोरीस जाऊ नये, अशी आपली अपेक्षा असते. त्याचप्रमाणे आपणही दुस-यांना फसवू नये, परस्त्री, परधनाला स्पर्श न केल्यास तीच नीती होय.
सर्वांनी आपल्यावर प्रेम करावे, मान द्यावा, संकट समयी मदत करावी असे वाटत असल्यास, आपणही सर्वांवर प्रेम करून, मान देऊन दुस-यावर संकट कोसळल्यावर त्यांना मदत करणे हीच नीती होय. नीतीच्या भक्कम पायावरच शरण आध्यात्मिक मंदिर बांधू इच्छितात.
(अ) नैतिक मूल्यात सत्याला फार मोठी प्रामुख्यता दिली आहे. ज्याप्रमाणे अंधार असलेल्या खोलीतील वस्तू दिसणार नाहीत, त्याचप्रमाणे असत्याचा अंधार पसरलेल्या ठिकाणी दैवीकृपा दिसणार नाही. म्हणूनच शिवशरण म्हणतात
सत्याच्या घरी देव वास करतो
असत्याच्या घरी असेल कां? वसेल का?
नाही, नाही कदापिही नाही कारण
माझ्या अखंडेश्वराला करण्या प्रसन्न
शिव कारूण्याचे गंगाजल मानव जन्माच्या घटात अगर घागरीत भरावयाचे असल्यास त्यातील असत्याची हवा बाहेर पड़ावयास हवे. म्हणून आपले जीवन सुन्न कसे असावे हे बसवेश आपल्या वचनातून सांगतात.
सत्य बोलावे, बोले तैसे चालावे
असत्य बोलनू चुकीचे वागणा-या प्रपंचीला
नसे होत प्रीत, कूडल संगम देवतात (ब.व. २०९७)
खोटे बोलत लिंगपूजा केल्यास ते पोकळ धान्य पेरल्याप्रमाणे व्यर्थ होईल. 'बोले तैसे चालणे’ झाल्यास तीच जीवनातील परमसिद्धी होय, म्हणून शरणांनी ठासून सांगितले आहे.
(आ) अहिंसा ही शरणांनी दिलेले दुसरे प्रमुख तत्त्व आहे. काया, वाचा, मनाने, या तीन्हीपासून हिंसा करू नये. आपले शरीर पोसण्यासाठी, आपण जगण्यासाठी कित्येक प्राण्यांना ठार करून खाणे व गरिबांचे शोषण करून श्रीमंत होणे हा घोर अपराध होय. सौजन्यता नसलेले कठोर बोलणे, आपल्या जिभेवर नियंत्रण नसल्याने सदैव दुस-यांचे मन दुखविणे हे पहिल्या प्रकारच्या हिंसावादी पेक्षा कनिष्ठ क्षेत्र समाजाला, शिक्षेला भिऊन शरीराने हिंसा न करता, बोलण्यात ही सौजन्यता दाखवून, मनांत मात्र द्वेष भावनेने जळत सर्वांना शिव्या घालणारा, शाप देणारा हा या सर्वांपेक्षा अधिक हिंसावादी म्हणावे लागेल कारण प्रथम याचे मन आणि जीवन कलुषित होऊन त्यानंतर दुस-याचे वाईट होइल. या तीनही प्रकारची हिंसा जो करीत नाही तोच शरण होय.
याविषयी महायोगिनी अक्क महादेवी आपल्या वचनातून म्हणतात.
कोळी जाऊनी जळी, शोधुनी आणि अनेक प्राणी
करूनी वध तयांचे, हर्षभरे तो नाचे
तयाच्या घरी मेल्यास लेकरू एक, होई तयाला शोक,
परि खंत न तया प्राण्यांची
ते कोळ्याचे दु:ख जगी होई हास
होऊनी चन्न मल्लेशांचे दास
हिंसा केल्यास, काय म्हणावे त्या मांगास? (अ. म. व. २०८)
एक कोळी जाळी घालून मासे पकडतो. अधिक प्रमाणांत मिळालेले मासे आपल्याच हाती मेलेले पाहून आनंदित होतो. पण तीच व्यक्ती स्वत:च्या घरी लेकरू मेल्यावर शोक करतो. आपल्या लेकराप्रमाणे त्या माशासही जीव आहे असे तो का मानत नाही? आपल्याप्रमाणेच दुस-यांना मानणे हीच नीती होय. शरण धर्मात अहिंसा तत्त्वाबरोबरच नीतितत्त्वाला जोडले असून आध्यात्मिक पायावर ते उभारले गेले आहे. "तू स्वत:वर प्रेम करण्याइतकेच तुझ्या शेजा-यावर प्रेम करावे" असे येशू ब्रिस्ताने सांगितले आहे. तर स्वत:ला सोडून उरलेल्यांना जंगम मानून म्हणजे देव मानून प्रेम करावे असे बसवेश्वरांचे म्हणणे आहे. अहिंसेचा बोध अनेक नास्तिक धर्मही करतात. सृष्टीकर्ता देव आहे हे मानत नसले तरी म्हणतात प्राण्यांना, सर्व जीवजंतुना तुझ्याप्रमाणे संवेदना असल्याकारणे त्यांची हिंसा कर नये आस्तिक असलेला लिंगायत धर्म सांगतो परमात्म्याचा अंश सर्व जीवात्म्यात असल्याकारणे त्यांची हिंसा करू नये, केल्यास तू देवाचीच हिंसा केल्याप्रमाणे होईल मांगचन्नय्या म्हणतात
हाती शस्त्र घेऊन मी मारु कोणास
जगी सर्व ठायी तुच भरून उरलास, पहा रामनाथा
सकल जीव राशीत परमात्मा व्याप्त असल्याकारणे त्यांना त्रास देऊन हिंसा करू नये चन्नमल्लिकार्जुनाचा भक्त असणा-याने जीव हिंसा करू नये असा कडक नियम आहे. म्हणूनच शिवशरणांनी मांग हा ठार मारतो, महार हा अभक्ष्य भक्षण करतो म्हणून जातीवाचक न म्हणता "जो ठार मारी तोचि मांग! जो भक्षी अभक्ष्य तोचि महार" असे सांगून गुण वाचक शब्दात बोलले आहेत. प्राणीवध करणे ही हिंसा, वध केलेले खाणे हा अनाचार होतो म्हणून या दोन्हीपासून दूर राहणे हाच शरांचा सदाचार होय. म्हणून त्यांनी दयेला केन्द्रस्थान दिलेले आहे. महात्मा बसवेश्वर आपल्या वचनातून म्हणतात
दयेविण धर्म तो कोणता?
दया असावी सकल प्राणीमात्रा ठायी !
दया हीच धमाचे मूळ’
न रूचे कुडलसंगमदेवासी दया विहीन कुळ
दया नसलेला, प्राणी हिंसा करण्यास संधी देणारा धर्म हा मानवीयतेच्या दृष्टीकोनातून धर्मच नव्हे. दया, गुण, अहिंसा तत्त्व ही धर्माची केन्द्र शक्ती असावी असे बसवेश्वरांचे मत आहे.
(इ) हिंसा बोलण्यातूनही करू नये, हाताने मारलेल्या आघातापेक्षा कटबोलण्याने होणारा आघात अति तीक्ष्ण असतो. गोड बोलण्यास पैसे खर्च होत नाहीत. गोड बोलण्याने दुस-यांचे मन आनंदित करण्याची संधी आपण कां गमवावी? आपल्या पुण्य व पाप कर्माला आपणच जबाबदार असतो.
पुण्य-पापक्रमांचे आम्हीच हो निर्माते !
आदराने वदावे वाचे
तिथेच स्वर्ग वसे साचे!
दुरहंकाराची जिथे भाषा,
तिथे नरक वसे हमेशा !
देवभक्त जय जय या गोड वाचेत
वसे कैलास-फूडल संगम नाथ (ब.व. 240)
माणसास हा आपणच आपला शत्रु व आपणच आपला मित्र आहे. दुसरे कोणीही त्याच्या प्रतनास कारणीभूत होत नाहोत. सर्वांबरोबर प्रेमाचे वागणे असल्यास बंधुत्व. द्वेष केल्यास शत्रु म्हणूनच देवापाशी बसवेशांची मागणी अशी आहे की,
"वाकलेले मस्तक जोडलेले हस्त असावे"
भेटण्यास येणारी व्यक्ती आपणास हवी असणारी असो वा नसो त्यांच्याशी सौजन्याने वागावे. बसवदेव म्हणतात.
कायहो आलात या, क्षेम का?
अशी केल्यास विचारपूस
झडेल का तुमच्या अंगावरील मांस !
या बसा म्हटल्यास तडेल का जमीन?
सत्वर बोलल्यास फुटेल का पोट मस्तक?
द्यावयास काही नसल्यास गुण तरी नको का?
कूडल संगमादेव अशांना शासन दिल्याविण राहील कां?
आलेल्यांना प्रेमभावनेने ‘बरे आहात का?' म्हटल्यास आपली श्रीमंती कमी होत नाही. ’या बसा' म्हटल्यास जमिनीस तडा पडणार नाही. आल्याबरोबर बोलल्यास तुमच्या मोठपणाला धक्का पोहोचणार नाही त्यांना पैसा अडका द्यावयास नसलात तरी प्रेमाने विचारपूस करणार एक सद्गुण असल्यास पुरेसे आहे. यावर बसवेश म्हणतात
आपणावरि रुसती म्हणून आपण
का रुसावे तयावरी?
रुसल्याने आम्हास काय मिळते?
तयांचे काय जाते?
तनुची कोपाग्नी करी ज्ञानाची हानी
कुडलसंगमदेवा घरातील अग्नि
घराची करी होळी? ती कां शेजार घर जाळी?
आपल्याला वाईट करणा-या विषयी आपण चुकूनही मनांत द्वेष भाव वाढू देऊ नये. शरीराचा कोप आपल्या व्यक्तिमत्त्वास धक्का देणार आणि मनातील कोप आपल्या बुद्धीला मलीन करून अंतरंगही कलुषित करतो. अशा कलुषित मनाने देवाची पूजा केल्यास ती त्याला सहन होणार नाही.
कोपिष्टाचा अभिषेक, रक्ताची धार
पापिष्टाची पुष्पार्चना, तीक्ष्ण आयुधाची जखम
प्रेमभरे कामहराची पूजा करील कोण?...
कूडल संगमदेवा' असे बसवेश्वरांचे वचन आहे.
म्हणून या सर्व कारणाने लिंगायत हा विश्वाच्या आकारात इष्टलिंगाची पूजा करतो. याकारणे देवाच्या सृष्टीत असणा-या प्रत्येक जीवाला तो श्रेष्ठ मानतो. त्याने सर्व जीवराशीचे चांगलेच व्हावे ही इच्छा बाळगावी. माणसावर प्रेम करण्याइतकेच प्राण्यावर प्रेम करावे. ज्याला प्राण देण्याची शक्ती नाही, त्याला प्राण घेण्याचा हक्क पोहोचत नाही, ज्याचे हक्क नाही ते केल्यास
ई) शरण नैतिक तत्वाला अधिक महत्व देतात यावर बसवेश्वर म्हणतात:
नाही मी भीत सळसळत येणा-या सापास!
नाही मी भीत धगधगत्या ज्वालेस!
नाही मी भीत तळपणाच्या खड्गाच्या धारेस!
मज वाटे भय परस्त्री-परधन या पातकांचे
पूर्वी न भ्यालेल्या रावणाची झाली कैसी गत,
मी भीतो, हे कूडल संगम नाथ!
शरण धर्मात पातिव्रत्य व सतिव्रताला फारच महत्व देण्यात आलेले आहे. इथे प्रवृत्ती-निवृती असे दोन प्रकार दिसून येतात.गृहस्थी असलेल्यांना आपल्या पत्नीशी निष्ठेने राहून तिच्याशिवाय सर्व महिलांना माता समजावे.हाच प्रवृती मार्ग होय.
संन्यासी असलेल्यांनी जगातील सर्व स्त्रीयांना माता, देवी, गौरी, भवानी असे समजावे. हेच निवृती तत्व होय. प्रवृती तत्वाप्रकारे परस्त्रीला वाईट नजरेने पाहू नको असे बसवेश्वर बोलतात.
मन माझे न धावे सैरावैरा
हे कथितो मी शपथेवर शंकरा
पर सतीस मानितो मी महादेवी
देवा कुडल संगमनाथ
वाहतो तुमच्या प्रमथगणांची शपथ
आपल्या पुरूषाशिवाय अन्य पुरूषाकडे कूदृष्टीने पाहिल्यास, आपल्या पत्नीशिवाय अन्य स्त्रीकडे कूदृष्टीने पाहिल्यास तो अक्षम्य अपराध असून, अघोर नरकाचे साधन होय. म्हणून असे पापकर्म करण्यास प्रवृत्त करीत असलेल्या आपल्या अंगांगांना निष्क्रीय करावे असे म.बसवेश्वर देवाला प्रार्थना करताना म्हणतात.
हे त्राता इकडे तिकडे न जाण्यापरि करावे मज पांगळा
हे दाता अवति भवती नजर न टाकण्यापरि करावे मज आंधळा
अन्य न ऐकण्यापरि करावे मज देवा बहिरा,
तव शरणपदाविण अन्यविषयी मन न धावण्यापरि
करा मज कूडल संगमेश्वरा
उ) जीवनात कित्येक वेळा निंदानालस्ती सहन करावी लागते, आपली चूक नसताना सुध्दा, कुणाचेही वाईट चिंतले नसतांनाही काही लोक उगीचच निंदा करतात. द्वेष करतात, तशा शिव्या देणा-यांना बसवेश काय म्हणतात ? पहा
मज जे मारिती, तयांना म्हणेन माझे मालक,
मज जे देती शिवी, तयांना म्हणेन माझे बंधु-भाई,
माझी जे करिती निंदा, तयांना म्हणेन माझे माय बाप,
मज जे छळिती, तयांना म्हणेन माझी धनी,
मज जे लेखिती हीन, तयांना म्हणेन माझे बंधूजन,
जे करिती स्तुती अपार, मज वाटे चढविती,
सुवर्णाच्या सुळावर, हे कूडल संगमेश्वरा!
कुणीही आपल्या पाठीमागे निंदा केल्यास अन् ते कुणीतरी आपल्यापुढे येऊन सांगिल्यास आपल्यास आंनद व्हावा म्हणे!कारण आपण काहीही खर्च न करता, आम्हाला शिव्या देऊन देऊन काहींना आनंद होत असल्यास त्यांच्या आनंदास आपणच कारणीभूत झालो म्हणून त्यांच्याविषयी किंचितही द्वेष मनी न आणता, परत त्यांना शाण मानून नमस्कार करावा म्हणे! अशी ही बसवेशांनी शिकवलेली आत्यतिक सहनशीलता होय.
ऊ) शरीराला पीडा देणारे दुर्व्यसन, मनाला संबंधित दुर्गुण या दोन्हीपासून मुक्त झाल्यावरच दैवी करूणेची धार सतत वाहते. याविषयी महात्मा बसवेश्वर म्हणाले,
अंग इच्छेस्तव करिती मद्य मांस भक्षण !
डोळ्यांच्या इच्छेस्तव परवधु मिलन !
लिंगवेषधारी असून काय प्रयोजन ?
वागतात जे लिंगमार्ग टाकून
अशांची जंगम मुखे होऊनी छी-थू
मृत्यू ही न टळे बा कूडल संगमनाथा”
असे दुर्व्यसन व दगुर्ण या दोन्हीपासून साधकाने मुक्त व्हावे.नीतिशास्त्र आणि अभ्यासाची सांगड घातलेले एक वचन सूत्रस्वरूपात आपल्याला बसवेशांनी दिले आहे. ते वचन लिंगायत धर्माचे सूत्रच नव्हे जर नीतीशास्त्राच्या या विभागास पूर्णविराम देणे इष्ट होइल.
करू नये चोरी, करू नये हत्या !
मानू नये राग, बोलू नये मिथ्या !
करू नये तिरस्कार, करू नये आत्मस्तुति !
करू नये असूया !
अंतरंग-बहिरंग शुध्दी असे यात,
कूडल संगमास वश करण्याची हीच रीत !
बहुतेक एक सामान्य कायक करणारा माणूस मला योगसाधना करण्याचे ज्ञान नाही, तपश्चर्येस वेळ नाही म्हणून माझ्यासारख्या सामान्य माणसावर देवाची कृपा होणार नाही का? असा प्रश्न विचारल्यावेळी महामानवतावादी बसवेशांनी श्री सामान्य माणसाला हे सत्र, शील सांगितल्यासारखे वाटते. तन, मन, वाचा यांच्याकडून चोरी करू नये, आपल्याला आवश्यक असलेल्यापेक्षा अधिक धान्य, वस्तु, राष्ट्रीय संपत्ती आपल्या ग्रही ठेवल्यास ती मोठी चोरी होय.
दुस-याची एखादी वस्तु घेऊन खोटेपणाने ती आपलीच. आहे असे सांगितल्यास ती शारिरीक चोरी, परस्त्रीचे सौदर्य चोरून पाहणे ही डोळ्यांनी केलेली चोरी, पाठीमागे निंदा केल्यास ती जिभेची चोरी, चोरून दुस-याचे बोलणे ऐकणे की कानाने केलेली चोरी, विवेकाला निषिध्द असलेल्या वस्तूंविषयी चिंतन करणे ही सुध्दा चोरीच. दस-यानी खाण्याचे एक घास अन्न अन्नावश्यक खाल्यास ती ही चोरीच होय.या सर्व प्रकारच्या चोरीपासून आपण दूर रहावे.
Reference: Lingayat Dharma Darpan - A Prose composition written by Her Holiness Maha Jagadguru Dr. Mate Mahadevi, translated by Sharni Sou. Shashikala Rajshekhar Madki
Pub: Vishwakalyan Mission, Basav Mantap, 2035, 20th Main, Rajajinagar, 2nd Block, BANGALORE - 560010.]
लिंगांगयोग (शिवयोग) | लिंगायत धर्मगुरु निष्ठा |