Previous लिंगायत तत्व दर्शन गुरू , जंगम Next

लिंगायत सिध्दांत

*

लिंगायत सिध्दांत

सिध्दांत हा धर्माचा आत्मा होय. तो जग आणि जीवन यास पाहण्याचा विशिष्ट दृष्टीकोन वाढवितो. सिध्दांतात ’जगन् मिथ्या' असे म्हणणा-यांना जीवनातील अनेक सत्य गोष्टींना मिथ्या म्हणावे लागले. केवळ आध्यात्मिक मूल्यच सत्य मानून सिध्दांतातील बाकी मूल्यांना मिथ्या समजल्यामुळे वैज्ञानिक प्रगतिस बाधा उत्पन्न झाली. असे जाणलेल्या शरणांनी जग हे सत्य आहे अशा विचार धारेस समर्थन दिले.

(अ) सिध्दांताच्या दृष्टीकोनातून लिंगायत हा परशिव, पराशक्ती, पुरूष, प्रकृति अशा चार तत्वांना सत्य म्हणून मान्यता देतो. आपल्या या पिंडांडाला (शरीराला) जसे माता-पिता आहेत तद्वत ब्रम्हांडाला परशिव, परशक्ती हे मातृ पितृ तत्व म्हणून मानतो. परशिव, परशक्ती म्हणजे दोन पौराणिक व्यक्ती नव्हेत. निमित्त आणि ‘उपादान' कारण असलेली ही दोन तत्वे आहेत. ती अविनाभाव संबंधात असून या जग निर्मितीस कारणीभूत होतात.

आविनाभाव संबंध म्हणजे पुष्पात परमळ फळात स्वाद, सोन्यात वर्ण असल्याप्रमाणे परशिव पराशक्तीचा संबंध आहे. यावर प्रभुदेवांचे वचन असे आहे की,

"शिवशक्ती संपुट कसे आहे ते सांगा
शिव हा चैतन्यात्मक, शक्ती ही चित्‌स्वरूप म्हणून
जाणणारा तोच शरण असे गुहेश्वरा"


(आ) ब्रम्ह हे एकच सत्य, जगन्मिथ्य या सिध्दांतास मान्यता नसल्याने, परमात्म्यापासून प्रकट झालेले, त्याच्या चैतन्याने भरून उरलेले हे जग केवळ सत्यच नव्हे तर हे जग दिव्यही आहे. असे शक्तीविशिष्टाव्दैत सिध्दांत सांगतो.

“त्या लिंगापासून झालेले देह, इंद्रिय, मन, प्राण हे सर्व त्या लिंगाचेच उपकरण होत. या कारणे मन प्राणादि सर्व त्या परवस्तू परमात्म्याहून भिन्न म्हणणा-या अज्ञानीला नसे प्रीय होत कूडलचन्न संगय्या' (च. ब. व. ५)

(इ) परमात्मा हा या सृष्टीत ‘अभिन्नभित्तोपादान' कारण रूप आहे. जसे कोळी (किटक) आपल्यापासून भिन्न नसलेले, लाळ रसापासून जड आपल्यातच असलेल्या जाळ्याचे घर विणतो. त्यातच तो रमतो. चैतन्यमय पिलांना जन्म देतो. तद्वत परमात्मा हा आपल्या अंतर्गत असलेल्या परशक्तीने जड असलेले जग आणि चैतन्यमय जीव यांचा निर्माण करतो व त्याच्या केवळ अतीत न राहता प्रेमाने त्यात राहून आपल्याला पुरेसे वाटल्यास या जगाचा लय करून आपल्यातच सामावून घेतो, अशा या सिध्दांताला लिंगायत मानतात. वरील सूत्र बसवण्णांनी आपल्या वचनातून परमात्मा हा या जगाच्या सृष्टीस कसा कारणीभूत आहे स्पष्टपणे सांगितले आहे.

सूचीत परत (index)
*
Previous लिंगायत तत्व दर्शन गुरू , जंगम Next